एलआयसी कार्यालयासमोर काँग्रेसचे अधिवेशन सुरु आहे. एलआयसीचे ५० हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” एवढा विश्वास एलआयसीवर होता. गेल्या ६७ वर्षात एलआयसीचे एक रुपयांचे नुकसान झाले नव्हते. पंडीत जवाहरलाल नेहरू, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, व्ही. पी. सिंह, नरसिंह राव, मनमोहन सिंह यांच्या काळात एलआयसीचे काहीच नुकसान झाले नाही. पण मागच्या सात वर्षात एलआयसीचे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा जनतेचा पैसा बुडाला आहे, तरिही सरकार म्हणत आहे ऑल इज वेल, हे निर्लज्जपणाचे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
“या विषयावर आम्ही सर्व विरोधी पक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या दालनात जमणार आहोत. विरोधक म्हणून काय भूमिका घ्यायची हे ठरवणार आहोत. त्याआधी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ विरोधी पक्षाचे सर्व खासदार आंदोलन करणार आहोत. अमृतकाळ म्हणून या वर्षाला सरकार म्हणत आहे. या अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यावर आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात कोणती पावले टाकायची याबाबत विरोधक म्हणून निर्णय घेऊ. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल.”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिल्ली येथे बोलताना दिली.
पंतप्रधान यावर मन की बात कधी करणार?
अदाणी यांच्या विषयावर माध्यमांनी विरोधकांना प्रश्न विचारून उपयोग काय? हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना विचारला गेला पाहीजे. या देशातील केंद्रीय तपास यंत्रणा लाख दोन लाख रुपयांसाठी विरोधकांच्या घरावर सीबीआय, ईडीच्या धाडी घालतात. पण मोठ्या घोटाळेबाजांना विचारले देखील जात नाही. पंतप्रधान याबाबत बोलायला तयार नाहीत. हा प्रश्न राष्ट्रहिताचा आहे. त्यामुळे माध्यमांनी पंतप्रधानांना यावर मन की बात का नाही करत? असा प्रश्न विचारला पाहीजे.
नाणार प्रकल्पाबाबत भाजपाचा ‘च’ वर जोर का?
नाणार प्रकल्प आणण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ‘च’ वर जोर देऊन आणणारच, असे म्हटले आहे. पण तिथल्या स्थानिक लोकांचेही मत लक्षात घेतले पाहीजे. एखाद्या कंपनीला कंत्राट देण्यासाठी भाजपाचे लोक ‘च’ वर जोर देत आहेत. आणणारच, करणारच, अशी भूमिका भाजपाचे लोक घेतात. त्यावरुन या देशाची काय अवस्था काय झाली आहे? हे आपण पाहतच आहोत. ‘च’ वर जोर देऊन चालणार नाही. नाणारच्या अवतीभोवती ज्यांनी जमीनी घेतल्या आहेत. त्यांची यादी फडणवीसांनी जाहीर करावी. नाणारच्या अवतीभोवती ज्यांनी जमीनी घेतल्या, त्यांच्यासाठी नाणार प्रकल्प आणला जात आहे. ही गुंतवणूक कुणाची आहे? गुंतवणूक करणारे लोक कुठून आले, हे आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. नाहीतर आम्ही जाहीर करु, मग ‘च’ वर जोर द्यावा.