Sanjay Raut On Hindu Pakistan: वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान सरकारला लक्ष्य केले आहे. यावेळी राऊत यांनी त्यांच्या भाषणात मोहम्मद अली जिना यांचाही उल्लेखही केला आणि त्यांचा आत्मा सरकारमध्ये शिरला असल्याचा टोला लगावला. यावेळी त्यांनी सभागृहातच दावा केला की, सरकार हिंदू राष्ट्र नव्हे तर हिंदू पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात

राज्यसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मी सर्वांचे भाषण ऐकले. गृहमंत्र्यांचे भाषण ऐकले, कायदामंत्र्यांचे भाषण ऐकले, कालपासून तुम्ही लोक मुस्लिमांची बॅरिस्टर जिना यांच्यापेक्षा जास्त काळजी करत आहात. मला असंही वाटलं की जणू बॅरिस्टर जिना यांचा आत्मा त्यांच्या कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला आहे. आधी आपण विचार करायचो की आपण एकत्र येऊन हिंदू राष्ट्र निर्माण करत आहोत, पण आता असे दिसते की तुम्ही हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात.”

हिंदू-मुस्लिमच्या मुद्द्यावर…

यावेळी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “तुम्ही आणलेले हे विधेयक लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ व्यापार कर आकारण्याची घोषणा केली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, तुम्ही त्याच दिवशी हे विधेयक आणले. ट्रम्प यांनी लादलेल्या कराचा आपल्या देशावर काय परिणाम होईल याबद्दल सभागृहात चर्चा व्हायला हवी होती. आपली अर्थव्यवस्था कोसळेल, आपला रुपया घसरेल. जनता या सर्व गोष्टींबद्दल विचार करत होती, पण तुम्ही त्यांचे लक्ष वळवून त्यांना हिंदू-मुस्लिमच्या मुद्द्यावर आणले.”

केदारनाथमध्ये ३०० किलो सोने गायब

“गृहमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोकळ्या जमिनी विकून गरीब मुस्लिम महिलांना मदत करू. पण, अयोध्येत १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये ३०० किलो सोने गायब झाले आहे. तुम्ही आमच्या हिंदूंच्या जमिनीचे रक्षण करू शकत नाही आणि मुस्लिमांच्या जमिनींचे रक्षण करण्याची भाषा बोलत आहात”, असा टोलाही राऊत यांनी सरकारला लगावला.

Live Updates