राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (२ मे) पार पडला. ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीत शरद पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवसेनेबद्दल मोदींना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा होती, असं शरद पवारांनी पुस्तकात नमूद केलं आहे.
यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते कर्नाटकात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “भाजपा सत्तेसाठी कोणालाही शेजेवर घेण्यास तयार असतो. भाजपाची सत्तेसाठीची भूमिका कायम आहे. त्यांनी महबूबा मुफ्तींबरोबर युती केली होती. शिवसेना फोडून मिंधे गट जवळ घेतला. तर ते कोणालाही जवळ घेऊ शकतात. ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू असलेले १० ते १२ लोक बरोबर घेतले, तर ते कोणत्याही प्रकारचा राजकीय व्यभिचार करू शकतात,” अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.
शरद पवार अध्यक्षपदावरून बाजूला झाल्याने लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपावर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “असं वाटत नाही. आत्ताच्या सुरू असलेल्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बाबी आहेत. शरद पवार हे जाणकार आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील.”
“सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे ‘शिवसेना’ असं आम्ही मानतो. आमचा कोणताही राजकीय स्वार्थ नाही. कारण, आम्ही सीमा भागात किंवा बेळगावात एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आलो, तर महाराष्ट्रातील १०५ हुतात्म्यांना काय तोंड दाखवायचं?” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.