माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपती राम नाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“पंडित नेहरुंनंतर अटल बिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षांचे ते लोकप्रिय नेते होते. ते आपल्या विचारधारेसोबत एकनिष्ठ होते. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले. देशाचे नेतृत्व कसे असावे हा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून मिळाला. हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत कधीही तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आणि देशातील एकात्मतेवर भर देऊन राजकारण करणारे अटलबिहारी वाजयेपयी होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेच्या झालेल्या युतीला वाजपेयी यांचे फार मोठे योगदान होते. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पंतप्रधान असताना ते अनेक विषयांवरु बाळासाहेबांसोबत चर्चा करत होते. आज जो भारतीय जनता पक्ष दिसत आहे त्याचे स्तंभ आहेत अडणवाणी आणि वाजपेयी. वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते,” असे संजय राऊत म्हणाले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. “अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या देशाच्या भरीव सेवेने आम्ही प्रेरित झालो आहोत. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या विकासाच्या उपक्रमांचा करोडो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.