भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधला असून सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी सांगितले होते की, देशाला खरा धोका हा खोट्या हिंदुत्ववाद्यांपासून आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे लोक हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान युद्ध काढतात. निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक असा एकही मुद्दा सोडत नाही. हे लोक कोण आहेत सगळ्यांना माहित आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना आव्हानही दिले होते,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“आता आपण पाहत आहोत की चीनने आतमध्ये घुसून आपल्या कानाखाली मारली आहे आणि आता दुसरा गालही पुढे करत आहेत. काश्मीरमध्ये पंडितांची हत्या होत आहे. देशात काय परिस्थिती आहे या मॅडमना माहिती असायला पाहिजे. महात्मा गांधी विश्वाचे नायक होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही गांधींच्या विचारांवर अनेकवेळा टीका केली होती. तरीही महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामचे ते नायक होते हे मानायलाच पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गांधीजयंतीला राजघाटवर जाऊन गांधीच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात. हे या मॅडमना माहित असायला हवं की संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शिवसेना सत्तेसाठी हिंदूना दोषी ठरवत आहे असा भाजपाने आरोप केला आहे याबाबत पत्रकरांनी विचारल्यावर संजय राऊतांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली. “ही त्यांची निराशा आहे आणि निराशा जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात,” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त यावेळी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांसाठी आणि देशातल्या हिंदूसाठी महान योद्धा होते. आजही त्यांचा आदर्श आणि प्रेरणा आमच्या मनामध्ये कायम आहे. त्यांचे स्मरण होत नाही असा एकही दिवस जात नाही. संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. काय ते मी आता सांगणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले.