भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. दीप्ती यांनी ९ डिसेंबर रोजी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, ज्यावर १२ डिसेंबर २०२१ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. संजय राऊत यांनी यापूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरले होते अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा आहे. देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. दिल्लीत माझ्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण मी सरळ माणूस आहे. मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“सरकारी यंत्रंणा माझ्यावर बोट उचलू शकत नाहीत म्हणून अशाप्रकारे तक्रारी करुन ज्याबद्दल गुन्हा दाखलच होऊ शकत नाही त्यासाठी कोणाला तरी पुढे करुन तक्रार केली जाते. मलाही सांगायचे आहे की ही शिवसेना आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
“इथे आमच्या महिलांनी त्यांच्या नेत्या विरोधात तक्रार केली तर त्यांनी तिथे त्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली आहे. असे चालत नाही. तुम्ही संविधानाबद्दल बोलता आणि संसदेचे अधिवेशन चालू असताना खासदाराविरोधात खोटा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रोत्साहन देता हे ठीक नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपाच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय?, असा सवाल उपस्थित केला होता. पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. चु**गिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.
संजय राऊत यांच्या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्याच वेळी संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून चु** या शब्दाचा अर्थ सांगितला. आसाममध्ये हे आडनावच असल्याचं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.