बॉलीवूड अभिनेत्री तथा नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली होती. या प्रकरणी कुलविंदर कौर नावाच्या या महिला सुरक्षारक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कंगणा रणौत यांना झालेल्या मारहाणीविषयी विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, मला कंगना रणौतबद्दल सहानुभूती आहे. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांचा सन्मानही राखला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“संबंधित महिला शिपाईने सांगितलं की त्यांची आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती. त्यामुळे आपल्या आईबाबत कुणी चुकीचं बोललं असेल राग येणं स्वाभाविक आहे. खरं तर कोणीही कायदा हातात घेऊ नये. मात्र, त्या महिला शिपाईने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला आहे. भारत माता तिची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले होते ते भारत मातेचे पुत्र होते, त्यामुळे जर कोणी भारत मातेचा अपमान केला असेल आणि त्यामुळे कोणाला राग आला असेल, त्याचा आपण विचार करायला हवा”, असं संजय राऊत म्हणाले.
“मला कंगना रनौतबद्दल सहानुभूती आहे. त्या आता खासदार आहेत. त्यामुळे अशाप्रकारे खासदारांवर कोणीही हात उगारू नयेत. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांचा सन्मानही राखला गेला पाहिजे. खरं तर या घटनेनंतरही शेतकऱ्यांच्या मनात भाजपाविषयी किती राग आहे, हे स्पष्ट होते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी २०२१ मध्ये शेतकरी आंदोलन झालं होतं, त्यासंदर्भात कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे नाराज असलेल्या कुलविंदरने विमानतळावर कंगनांच्या थोबाडीत लगावली होती. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं कंगना म्हणाल्या होत्या. तसेच कंगना यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं होतं. याच रागातून कुलविंदर कौरने कंगना यांना थोबाडीत लगावल्याचं म्हटलंय. याप्रकरणी कुलविंदरला निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचा – संजय राऊत यांचा टोला, “देवेंद्र फडणवीस छोटा राजन आणि नरेंद्र मोदी…”
कंगना यांना मारल्यावर कुलविंदर कौर काय म्हणाली होती?
“शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी म्हटलं होतं की त्या महिला १०० रुपयांसाठी आंदोलन करत होत्या. कंगना तिथे बसू शकल्या असत्या का? कंगना यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं होतं, तेव्हा आपली आई तिथे आंदोलन करत होती”, असं तिने म्हटलं होतं.