प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपाला कारवाई करावी लागली. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. शर्मा यांना पक्षाने निलंबित केले आहे. याबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला आखाती देशांकडे माफी मागावी लागत आहे असे म्हटले आहे. संजय राऊत हे अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. अनेक आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलवून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याचे समर्थन या देशात कोणीही करणार नाही. भाजपाला या प्रकरणी देशासह संपूर्ण आखाती देशांकडे माफी मागावी लागत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबतही भाष्य केले. “दहशतवादी भरदिवसा काश्मिरी पंडितांची हत्या करत आहोत ही छोटी घटना आहे का? भाजपा त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांशी सहमत आहे का हे सांगून टाकावे. काश्मिरी पंडितांची मदत करु असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हे कोणी भाजपाच्या नेत्याने म्हटले असते तर आम्हाला आनंद झाला असता. पण काश्मिरच्या बाबतीत फक्त राजकारण करणे त्यांच्या रक्तात आहे. तीन महिन्यात २७ काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. तर १७ मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. भाजपाची भाषा ही राष्ट्रीय एकात्मतेची नाही, असे संजय राऊत म्हणाले.

“इस्लामिक देशांनी पावले उचलल्यानंतर भाजपाने…”; नुपूर शर्मांवरील कारवाईवरुन काँग्रेसची टीका

दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. “फारच उशीर झालेली जाणीव जितकी जास्त काळ टिकेल तितके देशाचे भले होईल. भाजपा नेत्यांकडून इतर धर्म व पंथांविरुध्द टोमणे, खोडसाळपणा, धोरणे, कृती सर्रास झाल्या आहेत. नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई पुरेशी नाही. पंतप्रधान, गृहमंत्री व आदित्यनाथांपासून सुरू होणारी मोठी यादी आहे,” असे सचिन सावंत म्हणाले.

“इस्लामिक देशांनी काही पावले उचलल्यानंतर भाजपाने उचललेले पाऊल प्रामाणिक व मनापासून आहे असे म्हणता येणार नाही. देशाचे सर्वोत्तम हित हे सर्व समुदायांमधील शांतता आणि सौहार्दात आहे. हा गांधीजींचा भारत आहे आणि ते म्हणतात की मोदी सरकारने भारताला लाज वाटेल असे केले नाही,” असेही सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction to the insulting remarks made by two bjp office bearers about prophet mohammad abn