सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. सत्तेसाठी शिवसेना विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसली, अशी टीका देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात केली. मी खोटे बोललो होतो, असे काही क्षण गृहीत धरले तर प्रत्येक भाषणात मोदींचे नाव का घेण्यात येते होते, जाहिरात फलकांवर मोदींचे छायाचित्र किती मोठे लावण्यात आले होते, हे आठवावे. मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून विश्वासघात करण्यात आला, असा आरोपही शहा यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“२०१४ पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वास घात करणारे कोण याचं उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणी कट कारस्थाने केली याचे उत्तर त्यांनी द्यावे. पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत द्यावे. आम्हाला सुद्धा टला ट फला फ लावता येऊ शकतात. महाराष्ट्रात सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करुनसुद्धा सरकारचा एक कवचासुद्धा उडालेला नाही याचं दुखः आम्ही समजू शकतो. मी सांगतो सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात. हे दूर करा आणि आमच्यासोबत लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत पाठीमागून प्रतिहल्ले करत नाही. समोर लढायचे आम्हाला शिकवू नका,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

२०१४ साली शिवसेनेला दूर करा असे भाजपाच्या नेत्यांना सांगणारे कोण होते हे अमित शाहांनी स्पष्ट करावे- संजय राऊत

“मुख्यमंत्री पदाबद्दल ठरले नव्हते हे आपल्याला दोन वर्षानंतर आठवले का? याच्यावर आधी खुलासे झाले आहेत. सत्तेच्या वाटपाचा अर्थ काय होतो हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको. सत्तेच्या वाटपामध्ये मुख्यमंत्री पदसुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या पुण्यात खोटे बोलू नका. गृहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगावे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे ते पहा. पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही तुमच्या मर्यादेत रहा आम्ही आमच्या मर्यादेत राहू,” असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणतात, “पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर…”

“अमित शाह काल पुण्यात आले आणि त्यांचे जे काही वक्तव्य आहे संपूर्ण असत्याला धरून आहे. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये अमित शाह नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी आणि आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या अडीच वर्षापासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही हे वैफल्य आम्ही राज्यातल्या नेत्यांकडे असल्याचे पाहत आहे. पण आता त्यांचे सर्वोच्च नेतेसुद्धा त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलू लागले आहेत. हे पाहिल्यानंतर आम्हाला त्यांची दया येते आणि आश्चर्यही वाटले,” असे अमित शाह यांनी म्हटले.

दरम्यान, शाह यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत राजीनामा देण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा संदर्भ देत राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी आधी भाजपाच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शाह यांच्या आव्हानाला प्रति आव्हान दिलंय. “आपण सुद्धा हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे १०५ आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. तुमच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत १०५ निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reply after amit shah criticism abn