Sanjay Raut on Narendra Modi & RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात संघातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “मोदींच्या राजकीय वारसदाराबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. त्यांचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातील असेल.” त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, ती मोगली संस्कृती आहे.” यावर राऊत यांनी आज पुन्हा भाष्य केलं. तसेच त्यांनी मोदींच्या राजकारणातील निवृत्तीबाबत वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकीय पदांवरून बाजूला होण्याचा नियम स्वतः मोदींनीच केला आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात ते ७५ वर्षांचे होतील आणि त्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात. मोदींच्या याच नियमामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी राजकारणातून बाजूला झाले. आज हे भाजपावाले राम, राम, राम करत असले तरी राम मंदिराचं आंदोलन त्याच आडवाणी यांनी उभं केलं होतं. त्यांनीच देशातील जनता राममय केली होती. भाजपा सत्तेवर आल्यावर आडवाणी यांचा पंतप्रधानपदावर, राष्ट्रपतीपदावर हक्क होता. मात्र,औरंगजेबाने शहाजहानला कोंडून ठेवलं होतं, त्याचप्रमाणे मोदींनी लालकृष्ण आडवाणी कोंडून ठेवलं, राजकारणातून बेदखल केलं. ती मोगली संस्कृती नव्हती का?”

आम्ही संघ व भाजपाच्या अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवून असतो : संजय राऊत

शिवसेना (ठाकरे) खासदार म्हणाले, “मोदी आता ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळेच आरएसएस मुख्यालयात त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. आरएसएस ही भाजपाची मातृसंस्था आहे. याच मातृसंस्थेमुळे भाजपाचं सरकार आलं आहे. भाजपात किंवा त्यांच्या राजकारणात आरएसएसचं महत्त्व काय आहे हे मी सांगावं लागणं म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे नकली स्वयंसेवक आहेत. संघ व भाजपाच्या संबंधांवर मी बोलणं चुकीचं आहे. मात्र, इतर पक्षांमध्ये काय चाललंय याची माहिती ते ठेवतात. तशीच त्यांच्यात काय चाललंय याविषयीची माहिती आमच्याकडेअसते. आम्ही देशात, राज्यात राजकारण करत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ही माहिती असते. आम्ही त्यांच्या अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवून असतो.”

“भाजपाचे शिखरपुरूष नवे अध्यक्ष नेमू शकले नाहीत”, संजय राऊतांचा चिमटा

संजय राऊत म्हणाले, “भाजपा अध्यक्षपदाची मुदत संपली आहे, तरी भाजपाचे शिखरपुरूष (नरेंद्र मोदी) नवे अध्यक्ष नेमू शकले नाहीत. पक्षाचा नवा अध्यक्ष नेमताना संघाची भूमिका महत्त्वाची असेल. ही भूमिका पक्षाला मान्य करावी लागेल असं संघाचं म्हणणं आहे. याबद्दल आमच्याकडे पक्की माहिती आहे. तसं नसतं तर जे. पी. नड्डांची अध्यक्षपदाची मुदत संपताच ताबडतोब नवा अध्यक्ष नेमला असता. पक्ष व संघात अंतर्गत काही घडामोडी घडत आहे, रटा-रटा काहीतरी शिजतंय. काय शिजतंय ते तुम्हाला लवकरच कळेल.