पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हॅटिकन सिटी येथे शनिवारी रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतल्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या भेटीबद्दल भाष्य केलं आहे. राऊत यांनी ही भेट झाली हे चांगलं असल्याचं म्हणतानाच मोदींऐवजी इतर कोणी ही भेट घेतली असती तर त्यावरुन वाद झाला असता अशी टीका सांकेतिक टीकाही केलीय. सामनाच्या अग्रलेखामधून मांडण्यात आलेल्या भूमिकेचाच उल्लेख राऊत यांनी पुन्हा एकदा केल्याचं पहायला मिळालं.

मोदी हे पोप यांना भेटले. त्यांना पोप यांनी बायबलची प्रत भेट दिली. ती मोदींनी माथी लावून त्याचा सन्मान केला हे सर्व चांगलं आहे. हीच आपली शिकवण आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी, “मोदींऐवजी इतर कोणी (पोप फान्सिस यांच्या भेटीसाठी) गेलं असतं तर धर्म आणि राष्ट्र संकटात आलं असतं,” असा टोलाही लगावला.

अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे?
“युरोप दौऱ्यावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोपसाहेबांच्या सहवासात होते. पोपसाहेबांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला व मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे?,” असा खोचक प्रश्न सामनाच्या अग्रलेखामधून मोदी आणि भाजपा समर्थकांना विचारण्यात आलाय.

पोप यांना भेटणे यात एक आनंदच असतो
“मोदी यांनी पोप यांना भारतात यायचे खास आमंत्रणही दिले. मोदी हे इटलीत गेले व अचानक पोप यांना भेटले. चारेक वर्षांपूर्वी मोदी हे विमान प्रवासात असताना अचानक इस्लामाबादेत उतरले होते व नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते. कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वतःची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करीत असतात. मोदी हे पोप यांना भेटले. त्यांनी या सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले. पोपसाहेबांचे स्थान जगात मोठे आहे. त्यांच्या शब्दाला आणि अस्तित्वाला मान आहे. पोप यांना भेटणे यात एक आनंदच असतो,” असं लेखात म्हटलं आहे.

जगातील श्रीमंत धर्मगुरूंना भेटायला आपले पंतप्रधान गेले
“व्हॅटिकनच्या माध्यमातून जगभरात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे सामाजिक कार्य सुरूच असते. व्हॅटिकनची आर्थिक ताकद मोठी आहे. व्हॅटिकनची आर्थिक उलाढाल चार अब्ज युरो इतकी आहे. व्हॅटिकनची स्वतःची बँक आहे. त्या बँकेची उलाढाल आपल्या रिझर्व्ह बँकेच्या पन्नासपट आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत धर्म म्हणून ख्रिश्चन धर्माचाच उल्लेख करावा लागेल. जगातील ५५ टक्के संपत्तीचे मालक ख्रिश्चन धर्मीय आहेत. त्याखालोखाल ५.८ टक्के मुस्लिम, हिंदू ३.४ टक्के, ज्यू १.२ टक्के असा क्रम लागतो. म्हणजे जगातील श्रीमंत धर्मगुरूंना भेटायला आपले पंतप्रधान गेले,” असा उल्लेख लेखात आहे.

मनरेगा’वरुन काढला चिमटा…
“मोदी व पोप यांच्यात म्हणे जगातील गरिबी निर्मूलन तसेच हवामान बदलावर चर्चा झाली. पोप यांच्या व्हॅटिकन सिटीतून गरिबीचे निर्मूलन झाले आहे. अमेरिका, युरोपातील अनेक ख्रिश्चन देशही आपल्या गरीब जनतेची चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. या राष्ट्रांना आर्थिक महासत्ता म्हटले जाते. मोदी व पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? मोदी व पोप यांच्यात चर्चा सुरू असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातील २१ राज्यांत ‘मनरेगा’चे काम चालत असते. २०२०-२१ मध्ये ७.७५ कोटी कुटुंबांना या योजनेंतर्गत काम व रोजगार मिळाला. आता ही योजनाच आर्थिक संकटात सापडल्याने भारतातील गरीबांवर मोठेच संकट कोसळले आहे. पोप आणि मोदी भेटीत गरिबी निर्मूलनावर चर्चा झाली म्हणून मनरेगाचा प्रश्न आम्ही येथे मांडला.” असं लेखात म्हटलंय.

हे विचार सदैव कायम ठेवावे, इतकीच जगाची अपेक्षा
“भारतातील शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी एक वर्षापासून लढत आहेत. त्या गरीब शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याचे अघोरी प्रयोग झाले. गरिबी निर्मूलनाच्या जागी गरीबांचेच निर्मूलन करावे, अशी ही योजना दिसते. महागाईच्या वणव्यात गरीब होरपळला आहे. भारताची लूट करून उद्योगपती, नोकरशहा परदेशात पळून जात आहेत. अशाने मोदींच्या देशात गरिबीचे निर्मूलन कसे होणार? पोप यांच्याही मनात हे सर्व प्रश्न असणारच व पोप यांच्याबरोबरच्या चर्चेत गरिबी निर्मूलनाबाबत मतप्रदर्शन झालेच असणार. पंतप्रधान मोदी व पोपसाहेबांची भेट ऐतिहासिक असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘मोदी-पोप भेट इतिहासाच्या पुस्तकात नोंद करण्यासारखी आहे. शांतता, सौहार्द आणि परस्पर संवादाच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. भारत ही सर्वसमावेशक लोकशाही आहे. येथील ख्रिश्चन समुदायाने राजकारण, चित्रपट, व्यवसाय, सशस्त्र सेना यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.’ भाजपाने पोप तसेच ख्रिस्ती समुदायाविषयीचे हे विचार सदैव कायम ठेवावे, इतकीच जगाची अपेक्षा आहे,” असा टोला लेखातून लगावण्यात आलाय.

मोदी-पोप भेटीने
“पोप यांच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम चालते, असे भाजपा व त्यांच्या अंगीकृत संघटनांचे मत होते व आहे. भारतातील धर्मांतरांमागे मिशनरी आहेत असे आरोप भाजपच्या अंगीकृत संघटनांकडून होत असतात. भाजपा व संघ परिवाराची पोप तसेच व्हॅटिकनविषयी अंतःस्थ मते काहीही असली तरी पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटल्यामुळे ही भेट क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि जगाला दिशादर्शक वगैरे ठरलीच आहे. मोदी-पोप भेटीने गरिबी निर्मूलन होईलच व हवामान बदलाच्या समस्येवरही मार्ग निघेल,” असं लेखात म्हटलं आहे.

हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल
“पोपसाहेबांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारले व ते दिल्लीत येतील. १९९९ साली तेव्हाचे पोप दिल्लीत अवतरले होते. तेव्हाच्या पोप यांना सोनिया गांधी भेटल्या म्हणून तत्कालीन भाजपाने भलतेच काहूर माजवले होते, पण पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. आपला हिंदू धर्म हेच तर शिकवितो. स्वधर्माचे संरक्षण तर आपण केलेच पाहिजे, पण परधर्माविषयीही आदरभाव ठेवला पाहिजे. अन्य धार्मिक ग्रंथ मस्तकी लावले पाहिजेत अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता व शुद्धीकरण मोहिमा सुरू झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल,” असा उपहासात्मक टोला लेखातून लगावण्यात आलाय.

किरीट सोमय्या यांना इशारा…
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आरोपांवर बोलताना राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. पवार राष्ट्रीय नेते त्यांच्यावर आरोप करताना भाजपा नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये. आमच्या हाततही दगड आहेत, असंही राऊत म्हणाले. आम्ही अजून संयम बाळगला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. तसेच समोरच्याला हे करण्याची इच्छा असेल तर वाईट पातळीवर जाईल. महाराष्ट्रात अशाप्रकारची चिखलफेक होऊ नये, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader