४७ वर्षांनंतर लोकसभेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची आज अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली. ओम बिर्ला यांनी खुर्ची स्वीकारल्यानंतर या तिघांनीही त्यांचं हस्तांदोलन करून अभिनंदन केलं. यावरून संजय राऊत यांनी एक फोटो एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. बुधवारी सकाळी उरलेल्या काही खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झाली. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये उपाध्यक्षपदावर असहमती झाल्यानंतर काँग्रेसने केरळमधील खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे १९७६ नंतर पहिल्यांदाच अशी निवडणूक संसदेत पार पडली. आवाजी मतदान प्रक्रियेत हंगामी अध्यक्षांनी ओम बिर्ला यांना विजयी घोषित केलं.ओम बिर्ला यांना घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यांचं अभिनंदन करताना राहुल गांधी आणि ओम बिर्ला समोरासमोर असताना नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या मागे उभे होते.

हेही वाचा >> राहुल गांधी पाठीमागून येताच मोदींनी हसतमुखानं केलं हस्तांदोलन; संसदेत घडला दुर्मिळ प्रसंग, पाहा Video

लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही केंद्रीय नेत्यांनी एकमेकांवर तुफान शाब्दिक चिखलफेक केली. एवढंच नव्हे तर मी राहुल गांधींना ओळखतच नाही, असंही नरेंद्र मोदी म्हणाले होते. तर आता राहुल गांधी यांच्यामागेच नरेंद्र मोदी उभे होते, त्यामुळे नेमका तोच फोटो घेऊन संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “हा हा हाहा कोण राहुल? हे आहेत राहुल. हा तर ट्रेलर आहे. पुढे पुढे पाहा काय काय होतंय”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मोदींचे राहुल गांधींशी हस्तांदोलन

ओम बिर्ला यांची निवड जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरून उठून ओम बिर्ला यांच्या जागेवर गेले. तिथे मोदींनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. त्यांच्यात काही बोलणी सुरू होताच पाठीमागून विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले राहुल गांधी हेदेखील ओम बिर्लांचं अभिनंदन करण्यासाठी आले. त्यांना पाहताच मोदींनी हाताने त्यांना पुढे येण्याची विनंती केली.

राहुल गांधींनी पुढे होत ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्यांना अभिनंदन केलं. यानंतर लागलीच त्यांनी मोदींकडे पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधींकडे बघून हसतमुखाने हस्तांदोलन केलं. यानंतर या दोघांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत सोबत केली. तिथे पुन्हा एकदा आधी मोदींनी आणि त्यांच्यापाठोपाठ राहुल गांधी व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut share rahul gandhi and narendra modi photo of sansad and warn sgk