देशाच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने दरवर्षीप्रमाणे पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून सामनातील अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. मुलायमसिंह यांचा गौरव करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडलाय का? असा सवालही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, त्यांनी यावरून राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवरही सडकून टीका केली आहे.
“भाजपानं मुलायमसिंह यांचा उल्लेख हत्यारा असा केला”
“मुलायमसिंह यादव यांनी राम मंदिराच्या बाबतीत करसेवकांवर केलेला गोळीबार यावर आमचा आक्षेप आणि विरोध आहे. बाकी मुलायम सिंह यादव मोठे नेते होते. पण अयोध्याकांडमध्ये करसेवकांवर गोळ्या झाडण्याचं काम त्यांनी केलं. भाजपा, हिंदुत्ववादी संघटना – विहिंप, बजरंग दल यांनी याआधी मुलायमसिंह यांचा उल्लेख ‘हत्यारा’ असा केला. त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं म्हटलं होतं. अशा मुलायम सिंह यादव यांचा पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला आहे. आपल्या विचारात हळूहळू जो बदल होतोय, तो मी निदर्शनास आणला”, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे गटावर आगपाखड
दरम्यान, यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी राज्य सरकारवरही तोंडसुख घेतलं. “नुसती तैलचित्र लावून किंवा बाळासाहेब ठाकरे आमचे, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का? हे पाहावं लागेल”, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीकास्र सोडलं.
“मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण दिला असेल, तर वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपण विचार का केला नाही? बाबरी पाडल्यानंतर भाजपानं हात वर केले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे. वीर सावरकरांना तुम्ही भारतरत्न कधी देणार? तुम्हाला कुणी अडवलंय? तुम्ही याचा विचार का केला नाही? मुलायम सिंह यादव यांच्या पक्षानं, नातेवाईकांनी कोणतीही मागणी केली नव्हती. तरी तुम्ही ते दिलं”, असंही संजय राऊतांनी नमूद केलं.