संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर या अधिवेशनातून काय मिळालं, यावर चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण अधिवेशनकाळ विरोधी पक्षांचे १२ निलंबित खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन करत राहिले. तर संसदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून खडाजंगी होत राहिली. या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांनी सरकारला राज्यसभेतच शाप दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. सामनामधील रोखठोक या आपल्या सदरात संजय राऊत यांनी बाळासाहेबांची आठवण काढत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“संसदेची इमारतही क्षणभर थरथरली असेल”
संजय राऊतांनी जया बच्चन यांच्या त्या विधानावरून केंद्रावर निशाणा साधला आहे. “लोकशाहीत विरोधकांच्या वर्तनावर नेहमी बोट दाखवले जाते. पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे कितीही बेकायदेशीर असले, तरी त्यांच्याकडे कुणी बोट दाखवत नाही. जया बच्चन संतापाने थरथरत उभ्या राहिला आणि म्हणाल्या ‘मी तुम्हाला शाप देते, तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. आमचा गळाच एकदाचा घोटून टाका, लोकशाही खतम करा’, असे त्या म्हणाल्या. तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल. विरोधी पक्षाचा एवढा अपमान यापूर्वी कधी धाला नसेल”, असं या लेखात संजय राऊतांनी नमूद केलं आहे.
विरोधकांना कुत्र्यांसारखी वागणूक
केंद्र सरकार विरोधकांना कुत्र्यांसारखी वागणूक देत असल्याचं संजय राऊत म्हणतात. “जुन्या मातोश्री निवासस्थानी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत एक पाटी होती. त्यावर लिहिलेलं ‘जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो, तो तो मला माझ्या कुत्र्याची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते-लामरटीन’. यावर बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करत आहात. माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात. आज दिल्लीच्या राजकारणात स्वत:ला देव म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत”, असं संजय राऊतांनी यात म्हटलं आहे.
आता मथुरेतल्या मंदिराची घोषणा!
दरम्यान, संजय राऊतांनी या लेखात मथुरेतील मंदिराबाबत केंद्रानं केलेल्या घोषणेवर बोट ठेवलं आहे. “निवडणुका आल्या, की आजचे दिल्लीतील सत्ताधारी हिंदू पुढारी नवनवी मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडतात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आता अयोध्येचे महत्व संपले आहे. त्यामुळे मथुरेत मंदिर बांधून देऊ असे सांगितले गेले, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनात ७०० बळी मंदीर बांधून देऊ सांगणाऱ्या माणसांनीच घेतले. त्यातले १३ लखीमपूर खेरीमध्ये चिरडून मारले गेले. त्यांच्या गुन्हेगारांना मंत्रिमंडळात ठेवून कोणते मंदीर बांधणार?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
“..तेव्हा गांधींच्या डोळ्यांतील अश्रूही ओघळले असतील”
“सत्याची कास धरणारे महात्मा गांधी फक्त संसद भवनासमोर पायाची घडी घालून ध्यानस्थ बसले आहेत. त्या गांधींच्या पायाशी संसदेतले १२ खासदार तीन आठवडे बसले होते, तेव्हा गांधींच्या डोळ्यांतील अश्रू त्यांच्या शरीरावर कदाचित ओघळले असतील. १९७१ च्या बांगलादेश युद्धात विजय मिळवून देणाऱ्या इंदिरा गांधींचे नाव सरकार घेत नाही. गोवा मुक्ती लढ्यात पोर्तुगीजांना हाकलून देणाऱ्या पंडित नेहरूंचे नाव आपले पंतप्रधान घेत नाहीत. देश घडवणाऱ्या, इतिहास रचणाऱ्यांची नावे टाळून नवा इतिहास घडवता येत नाही हे त्यांना कधी समजणार?” असं राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.