दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षांनी या कारवाईवर टीका केली असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षांनी परखड भाष्य केलं आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे. निवडणूक रोखे प्रकरणावरून देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
“सगळ्यात आधी भाजपा अध्यक्षांवर गुन्हा दाखल व्हायला हवा”
“केजरीवाल यांची अटक पूर्णपणे घटनाबाह्य व राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे. भाजपाला मिळालेले निवडणूक रोखे तपासा. याच घोटाळ्यातील प्रमुख ठेकेदारांनी भाजपाला निधी दिला आहे की नाही ते समोर येऊन त्यांनी सांगावं. गुन्ह्याचा पैसा जर तुमच्या खात्यात आला असेल, तर सगळ्यात आधी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा भाजपाच्या अध्यक्षांवर दाखल व्हायला हवा. पण निवडणूक रोख्यांवरून उडणाऱ्या धुरळ्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक केली आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
ज्यांची भीती वाटते, त्यांनाच अटक – संजय राऊत
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ज्या लोकांची भीती वाटते, त्यांच्यावरच अटकेची कारवाई केली जाते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. “उद्या ते कुणालाही अटक करू शकतात. मोदी-अमित शाहांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सगळ्यांना हे अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर या सगळ्यांची भीती वाटत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकलं किंवा फासावर लटकवलं. मोदींचं सरकार त्याच पद्धतीने चाललंय”, असं राऊत म्हणाले.
“भारतीय जनता पक्षावर निवडणूक रोखे घोटाळा शेकलेला आहे. हजारो कोटी रुपये खंडणी, हफ्तावसुली, दहशतीच्या माध्यमातून गुन्हेगारांकडून गोळा केले आहेत. भाजपा स्वत:ला हिंदुत्ववादी समजते. गोवंश हत्या बंदीसाठी मोठं आंदोलन त्यांनी केलं. मॉब लिंचिंग केलं. कुणाकडे मांस सापडलं तर हे गायीचं मांस असल्याचं म्हणत लोकांना मारलं जातं. पण भाजपा कत्तलखान्यांकडूनही देणग्या घेते. जिथे गायीचं मांस कापून निर्यात केलं जातं, त्यांच्याकडूनही भाजपानं देणग्या घेतल्या आहेत. हे यांचं हिंदुत्व आहे. ते लोकांना फसवत आहेत. समोर येऊन कोणत्या कंपन्या आहेत ते सांगा नाहीतर मी सांगतो”, असं आव्हानच संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला दिलं आहे.