पुढील महिन्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या अनुषंगाने भाजपा व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यावरूनही राजकीय दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“इतिहास आणि भाजपाचा संबंध नाही”

संजय राऊतांनी भाजपाच्या प्रचारावर टीका करताना खोचक टिप्पणी केली. “इतिहास आणि भाजपाचा अजिबात संबंध नाही. कारण या देशाचा इतिहास घडवण्यात, स्वातंत्र्य लढा किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अयोध्या आंदोलन अशा या देशाच्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाहीत, पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाहीत. हे काहीच घडवू शकले नाहीत”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

“आडवाणीही म्हणाले होते की बाबरी…”

“ते म्हणतात हा देश २०१४ नंतर निर्माण झाला. त्यामुळे भाजपाही २०१४ नंतरच निर्माण झाला. मग तर अयोध्या आंदोलनही त्यानंतरचं आहे. हे रणछोडदास आहेत. हे पळपुटे आहेत. त्यांनी भाजपाचाच इतिहास पाहिला पाहिजे. भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांचं त्या वेळचं वक्तव्य आहे की बाबरी पाडण्याचं कृत्य शिवसैनिकांनी केलं असून भाजपानं केलेलं नाही. हे भाजपाचे प्रवक्ते व राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणाले आहेत. लालकृष्ण अडवाणीही म्हणाले होते की बाबरी पाडणं हे भाजपाचं काम नाही. मग कुणी केलं? आकाशातून मारेकरी आले होते का? ते शिवसैनिक होते”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“ते करणारे शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली. ते पळून नाही गेले. यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. २०१४ नंतर जन्माला आलेली ही बालकं आहेत. त्यांना आधीचा भारत, आधीचा संघर्ष माहिती नाही. यांचं कामच आहे लोकांनी बनवलेली लोणची-पापड विकायचं”, असा टोला राऊतांनी लगावला.

“…तेव्हा हे सगळे बिळात लपले होते”

“शिवसेनेचे त्या वेळचे सगळे खासदार अयोध्येच्या भूमीवर उपस्थित होते. हे सगळे लोक त्या खटल्यातले आरोपी आहेत. मग जर आमचं अस्तित्व लोणच्याएवढंही नव्हतं तर मग यांना आरोपी का केलं? आमचा रमाकांत पांडे, पवन पांडे आरोपी आहेत. या माणसांना काही माहिती आहे का? हे तेव्हा बिळात लपले होते”, असं राऊत म्हणाले.

“राम मंदिर काय तुमच्या बापाचं आहे का?”

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाऊ नये, अशी विधानं करण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “राम मंदिर काय कुणाच्या बापाचं आहे का? तुम्ही काय राम मंदिराचे मालक आहात का? तुम्ही या देशाचे अपशकुन आहात. इव्हीएम आहेत म्हणून तुम्ही आहात. जनता तुमच्याबरोबर नाहीये. नरेंद्र मोदी रामाचे अवतार आहेत हे हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? आरएसएसला मान्य आहे का? विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का ? हे त्यांनी सांगावं. रामापेक्षा कुणी या देशात मोठं झालंय का? कुणी नवीन ब्रह्मदेव जन्माला घातलाय का?” असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले.

“तुम्ही कुठल्या बिळात कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून तुम्ही ब्रिटिशांची माफी मागत आले. स्वातंत्र्यलढ्यात हे लोक ब्रिटिशांचे मुखाबिर होते. क्रांतीकारकांची माहिती ब्रिटिशांना देण्यात हे लोक पुढे होते. ते या देशाचे राज्यकर्ते झाले आहेत. हे देशाचं दुर्दैवं आहे”, असंही राऊत म्हणाले.