युद्धग्रस्त युक्रेनमधील ६८८ भारतीय नागरिक रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एअर इंडियाच्या तीन विमानांतून रविवारी देशात परत आले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेला भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ असं नाव दिलं आहे. रविवारी सकाळी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुखारेस्टहून आलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शिंदेंनी मोदींचा अनेकदा उल्लेख केल्याचं पहायला मिळालं. मात्र आता भारत सरकारच्या याच ‘ऑपरेशन गंगा’वरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर टीका केलीय. उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे नाव देण्यात आल्याची टीका राऊत यांनी केलीय.
भारतीय मुलांना मारहाण होतेय, केंद्र सरकार मागे पडतंय असं वाटतं का?, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “नक्कीच” असं म्हटलं. “आतापर्यंत जगात अनेक युद्धं झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते,” असंही राऊत ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी या मोहिमेच्या नावावर आक्षेप घेतला. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘ऑपरेशन गंगा’ नाव देण्यात आलं आहे, अशी टीका त्यांनी केली. “उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून ‘ऑपरेशन गंगा’. देशाची मुलं संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय. पक्षाचा प्रसार दिसतोय तर त्याला मी राष्ट्रीय बाणा म्हणत नाही,” असा टोला राऊत यांनी लागवला आहे.
नक्की वाचा >> Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीयन महासंघाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले, “पहिल्यांदाच आम्ही हल्ला झालेल्या…”
“मी विद्यार्थ्यांचा पालकांचा आक्रोश पाहतोय. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण होतेय. त्यांना मारहाण होतेय. त्यांच्याकडचे पैसे संपलेत. त्यांना येण्याचा मार्ग दिसत नाहीयत. या देशात किंवा जगात अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. सरकारने राजकारण, प्रपोगांडा बाजूला ठेऊन यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,” असंही राऊत म्हणालेत.
नक्की वाचा >> Ukraine War: जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”
दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १३ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचे प्रयत्न सरकार करते आहे. शनिवारपासून भारताने तेथे अडकलेल्या आपल्या ९०७ नागरिकांना परत आणले आहे. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बुखारेस्टहून आलेल्या विमानाने २१९ लोक शनिवारी मुंबईत उतरले.
नक्की वाचा >> Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन
२५० भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्टहून निघालेले दुसरे विमान रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरले. त्यापूर्वी, २४० प्रवासी असलेले तिसरे विमान बुडापेस्टहून निघून सकाळी ९.२० वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. यानंतर १९८ प्रवाशांसह एअर इंडियाचे आणखी एक विमान बुखारेस्टहून निघून सायंकाळी ५.३५ वाजता दिल्ली विमातनळावर उतरले.