गेल्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत देशाच्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती विरोधकांनी संसदेच्या बाहेर सुरू केलेल्या आंदोलनाची. गेल्या महिन्याभरापासून विरोधी पक्षांच्या १२ निलंबित खासदारांनी संसदेबाहेर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन सुरू केलं आहे. त्यासोबतच, लखीमपूर खेरीच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी आता आपला विरोध तीव्र करायला सुरूवात केली आहे. आज दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.
लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यंना गाडीखाली चिरडणाऱ्या आशिष मिश्राचे वडील आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा राजीनामा घेतला जावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी विरोधकांनी केंद्र सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. सातत्याने विरोधक याबाबत आक्रमकपणे भूमिका मांडत असताना केंद्र सरकार मात्र अद्याप कारवाई करत नसल्यामुळे विरोधकांचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.
संसदेचं सत्र संपेल, पण लखीमपूर खेरी…
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी लखीमपूर खेरीबाबतच्या मागणीवर विरोधक ठाम असल्याचं नमूद केलं. “संसदेचं सत्र संपू शकतं. हे सरकारच्या मर्जीने होईल. पण मला वाटतं लखीमपूर खेरीचा लढा संपणार नाही. पूर्ण जगानं पाहिलंय की कशा प्रकारे मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं. पण आमच्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी ते पाहिलं नाही. ही एसआयटी तर तुम्हीच तयार केली. त्यांचा अहवाल आला. पण तरीही तुम्ही ऐकायला तयार नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले.
“देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आम्हालाच प्रश्न विचारतात की महाराष्ट्रात काय चाललंय. पण तुमच्याच राज्यात तुमच्या नाकाखाली काय घडतंय, हत्या होतेय त्यावर तुम्हाला प्रश्न विचारणं योग्य वाटत नाही. तुम्ही कारवाई करत नाही”, असं ते म्हणाले.
“मग भले तुम्ही आम्हाला सर्वांना निलंबित करा”
दरम्यान, लखीमपूर खेरी प्रकरणावरून संजय राऊतांनी विरोधकांच्या मागणीचा यावेळी पुनरुच्चार केला. “विरोधकांची ही एकजूट वारंवार सरकारला प्रश्न विचारत राहील. मग तुम्ही आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा. आज १२ खासदारांना निलंबित केलंय, पुढच्या सत्रात ५० करा, आम्हा सर्वांना निलंबित करा. पण आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणं बंद करणार नाही. तुमच्या मंत्रिमंडळात जे खुनी बसले आहेत, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असं राऊतांनी यावेळी सांगितलं.
“…तर त्याच रात्री प्रकरण गुंडाळलं असतं”
“मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे आभार मानतो, की तुम्ही हा मुद्दा उठवला नसता, त्या दिवशी रात्री तिथे पोहोचले नसते, तर त्याच दिवशी रात्री हे पूर्ण हत्येचं प्रकरण गुंडाळलं असतं. त्यामुळे मी सर्व विरोधकांच्या कडून तुमचे आभार मानतो”, असं राऊत म्हणाले.