भाजपाला निवडणुका नुसत्या जिंकायच्या नाहीत तर ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगात त्यांना यस सर करणारेच लोक हवे आहेत, अशाच लोकांची नियुक्ती केली जाते आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयुक्त हे भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. घटनात्मकदृष्ट्या काम करत नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही आता लोकशाहीची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू शकत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
सर्वाधिक इलेक्टोरल बाँड हे कुठल्या पक्षाला दिले गेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. भुपेश बघेल यांच्यावर गेमिंग अॅपच्या संदर्भातच रेड पडली. याच गेमिंग कंपनीने १३ हजार कोटीचे बाँड घेतले आणि सत्ताधारी पक्षात ते पैसे गेले आहेत. हजारो कोटींची कंत्राटं द्यायची आणि शेकडो कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी करत आहेत. पैसे भाजपाच्या खात्यात जात आहेत. यात एक पाकिस्तानची कंपनीही आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून हे पैसे भाजपाच्या खात्यात जात आहेत.
पंतप्रधानांचा तो नारा कुठे गेला?
पंतप्रधानांचा न खाऊंगा ना खाने दुंगा हा नारा कुठे गेला? पंतप्रधान कार्यालय हा भ्रष्टाचाराचा स्रोत आहे. पीएम केअर फंडात किती पैसे जमा झाले त्याचा हिशेबच नाही. पण हा खासगी फंड आहे. या देशातल्या इतिहासातला सर्वात मोठा इलेक्टोरल बाँडचा आहे. ३५० कंपन्या यात अशा आहेत ज्यामध्ये सरकारी यंत्रणांनी छापेमारी केली आहे.ज्या कंपन्यांवर छापे पडलेले नाहीत, पण छापे पडणं आवश्यक आहे अशा कंपन्यांचा पैसाही भाजपाच्या खात्यात गेला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हे पण वाचा- निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नेमका निकाल काय? जाणून घ्या..
जागा वाटपात मतभेद नाहीत
आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. जागावाटपाच्या बाबतीत आमचे कुठलेही मतभेद नाहीत. आमचं सगळ्या जागांवर एकमत झालं आहे. महाराष्ट्रातल्या एक दोन जागांवर चर्चा होईल असंही संजय राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीला आज प्रकाश आंबेडकर येणार नाहीत. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. आजची आमची चर्चा काँग्रेस बरोबर होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही वेगळी चर्चा करु असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पाडापाडीचं भूत कुणाच्या मानगुटीवर बसलंय माहीत नाही. आम्हाला भाजपाला, हुकूमशाहीला पाडायचं आहे. प्रकाश आंबेडकरांना हे माहीत आहे. आजची बैठक मविआ म्हणून होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात चर्चा होणार आहे असंही संजय राऊत म्हणाले.