लोकसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकांआधीच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचा प्रत्यय आला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळालं. खुद्द मोदींनीही राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रदर्शनासाठी केलेल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसला लक्ष्य केलं. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यांनी मोदींना लक्ष्य करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
“महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचेच राज्य सुरू आहे व त्यास पंतप्रधान मोदी व शहा जबाबदार आहेत. गुंड खुलेपणाने राज्यकर्त्यांना भेटू शकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिवसेनेचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी मारिस या गुंडाने गोळय़ा झाडल्या व हत्या केली. बंदूक चालवण्याचा हा आत्मविश्वास आला हेच गुंडाराज. हा आत्मविश्वास गुंडांना मोदी-शहा, शिंदे-फडणवीसांमुळे मिळत आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
“महाराष्ट्राच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण?”
“भ्रष्टाचार, अपहरण, खंडणी, हत्या हा व्यापार भरभराटीस आला व इतर सर्व उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले तरी शिंदे-पवार काळात गुन्हेगारीचा व्यापार वाढला. महाराष्ट्रातील ठेकेदार आणि इंजिनीअर संघटनांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संयुक्त पत्र लिहून गुंडगिरीपासून संरक्षणाची मागणी केली”, अशा शब्दांत आक्षेप घेतानाच संजय राऊतांनी “महाराष्ट्र राज्याच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला आहे.
सुधारणा, सुशासन, परिवर्तन; पंतप्रधानांच्या भाषणात गेल्या पाच वर्षांतील निर्णयांचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र!
दरम्यान, संजय राऊतांनी या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं आहे. संसदेत मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या केलेल्या उल्लेखाचं उदाहरण देऊन संजय राऊतांनी मोदींना टोला लगावला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथच्या गुहेत जाऊन तपश्चर्या व आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. मोदी खोटे बोलतात व त्या खोटेपणाची ‘री’ त्यांचे लोक ओढतात. अधिवेशनातील भाषणात पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवले, असे एक विधान त्यांनी केले. इंदिरा गांधींवरही ते बोलले. पण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आपला देश मेहनतीने उभा करायचा हा संदेश नेहरूंचाच होता”, असं राऊतांनी नमूद केलं आहे. तसेच, ‘आराम हराम है’ हा नाराही नेहरूंनीच दिल्याचं राऊतांनी लेखात म्हटलं आहे.
“टेकचंदानीचा जबाब पोलिसांनी उघड केला तर…”
महाराष्ट्र गुंडांचे राज्य व्हावे यासाठीच मोदी-शहांनी शिवसेना फोडली. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर ललित टेकचंदानी याने दिलेला जबाब पोलिसांनीच उघड केला तर सरकारची उरली सुरली इज्जतही खतम होईल. शिंदे सरकारने गुंड पोसले. तसे गुंडांना संरक्षण देणारे पोलीस अधिकारीही पोसले. हे पोलीस अधिकारी गुंड टोळीचे सदस्य असल्याप्रमाणेच आज काम करीत आहेत. जणू काही शिंदे-पवार-फडणवीसांचे महाराष्ट्रातील गुंडाराज अनंत काळ चालणार आहे”, अशी सूचक टिप्पणीही राऊतांनी केली.