काही दिवसांपूर्वीच अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यावेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे ‘श्रीमान योगी’ असा केला. यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही दाखले दिले आहेत.
“मोदी कधी श्रीराम, कधी विष्णूचे अवतार तर कधी…”
संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख केला आहे. “भाजप नेत्यांचे व भाजपपुरस्कृत संत-महंतांचे म्हणणे असे की, मोदी हे शिवाजीराजेच आहेत व ते नसते तर अयोध्येत राममंदिर उभेच राहिले नसते. थोडक्यात, भाजपच्या संतांनी आता मोदी यांना ‘शिवाजी’ केले. मोदी कधी श्रीराम, कधी विष्णूचे तेरावे अवतार, तर कधी छत्रपती शिवराय असतात. ते फक्त देशाचे कर्तव्यतत्पर, धाडसी पंतप्रधान नसतात. मोदींची तुलना जे छत्रपती शिवरायांशी करतात ते एक प्रकारे शिवरायांचाच अपमान करत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी यावर आक्षेप घेतला आहे.
“फडणवीसांचा डीएनए का खवळत नाही?” प्रकाश शेंडगेंचा सवाल; म्हणाले, “आमच्या पाठीत खंजीर खुपसला अन्…”
“शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोगली आक्रमणाशी सामना केला. त्यांच्या हातात राज्य आयते पडले नाही. ‘ईव्हीएम’ व श्रीमंत सावकारांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नाही. ‘ईव्हीएम’ हे भाजपचे सुदर्शन चक्र आहे. ते नसेल तर मोदी व त्यांच्या पक्षाचे काय होईल? याचा खुलासा मोदींना घोड्यावर बसवणाऱ्यांनी करायला हवा”, असा टोलाही त्यांनी लगावला.
“शिवाजी महाराज जर देव-देव…”
“लडाखमध्ये चीन घुसला आहे. कश्मीरात ‘पंडित’ हिंदूंना त्यांच्या घरी जाता येत नाही. मणिपूर अशांत आहे. कारण पंतप्रधान पेशव्यांप्रमाणे पूजा, व्रतवैकल्ये, अनुष्ठानांत गुंतले आहेत. शिवाजी महाराज हिंदू रक्षक होतेच, पण ते सदैव ‘धर्म’, ‘देव देव’ करीत पूजेला बसले असते तर ते आग्य्राच्या कैदेतून सुटले असते काय व मोगलांना पळवून लावले असते काय? शिवरायांचे स्वराज्य हे पैशांतून, खोटेपणातून, ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यांतून निर्माण झाले नव्हते. त्यांना भवानी मातेचा प्रसाद लाभला. तो प्रसाद त्यांनी शौर्य म्हणून देश व प्रजेसाठी वापरला”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.