पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राज्यसभेत केलेल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. “नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते”, असं म्हणत तेव्हा जर आरक्षण दिलं असतं तर मागास वर्गातील लोक आज संसदेत असते, असा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. या भाषणावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊतांनी पंडित नेहरूंवर केलेल्या टीकेवरून आपली भूमिका मांडली. “या लोकांना इतिहासाचं भान नाही. काल मी भाजपाच्या एका नेत्याचं भाषण ऐकलं. ते म्हणाले की काँग्रेसनं वारंवार कसा बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. शेवटी त्या वक्त्यानं सांगितलं की भंडारा मतदारसंघात काँग्रेसनं आंबेडकरांचा पराभव केला. गंमत अशी आहे, की तेव्हा बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार नव्हते. पण त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती, ते तिकडचे काँग्रेसचे नेते मनोहर पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल हे आज भाजपामध्ये आहेत”, असं राऊत म्हणाले.

“मनोहर पटेल तेव्हा भंडाऱ्याच्या निवडणुकीचे प्रमुख होते. तेव्हा काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या प्रफुल्ल पटेलांना तुम्ही वाजत-गाजत पक्षात घेतलंय. त्यामुळे हा ढोंगीपणा भाजपाच्या धमन्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे. पंडित नेहरूंच्या संदर्भात त्यांनी केलेली वक्तव्य हे नेहरूंचं यश आहे असं मी मानतो. नेहरूंचं निधन होऊन ६० वर्षं झाली. पण गेल्या १० वर्षांत मोदी त्यांच्या नावाचा जप करतायत. जेव्हा मोदी पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचं स्मरण कुणाला राहणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

भाजपाला काँग्रेसची भीती वाटते – संजय राऊत

दरम्यान, भारतीय जनता पक्षाला काँग्रेसची भीती वाटते, असं राऊत म्हणाले आहेत. “आजही भाजपाला काँग्रेसची भीती वाटते. इंडिया आघाडीची भीती आहे. तुम्हाला तुमच्या हिंमतीवर, ताकदीवर ४०० जागा मिळणार आहेत असं तुम्ही म्हणताय ना. मग गेल्या १० वर्षांत तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? ५०-६० वर्षांचा इतिहास तोडून-मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी बोला. पंतप्रधानांच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही. तुम्ही काँग्रेसमुळे राष्ट्र कसं दुभंगलंय असं म्हणता. पण मणिपूर दुभंगलंय. तुमच्या मनात मणिपूरबद्दल थोडीही वेदना नसावी?” असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

“तुम्ही कश्मिरी पंडितांविषयी एक शब्द बोलला नाहीत. ज्या कश्मिरी पंडितांच्या नावावर २०१४ला तुम्ही मतं मागितली. त्यांच्या घरवापसीवर आधी तुम्ही बोलत होतात. पण आता त्यांच्यावर तुम्ही बोलला नाहीत. लडाखमध्ये चीन घुसलाय त्यावर तुम्ही बोलला नाहीत. पण फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचं भजन करत बसलात. आता हे रामालाही विसरले आणि पुन्हा काँग्रेसच्या मागे लागलेत”, असा टोलाही राऊतांनी लगावला.

“श्वेतपत्रिकेत सिंचन घोटाळाही घ्या”

दरम्यान, केंद्र सरकार २०१४पूर्वीच्या गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली.

“त्यांनी श्वेतपत्रिका काढायलाच पाहिजे. पण त्याला एक पुरवणी जोडली पाहिजे. त्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचाय २ हजार कोटींचा नळ-पाणी घोटाळा, हसन मुश्रीफ यांचा घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचा मिरची घोटाळा, अलिकडचा ८ हजार कोटींचा घोटाळा यांचा समावेश करावा. तरच ती श्वेतपत्रिका पूर्ण होईल. भाजपानं असं अपूर्ण काम करून सरकारमधून बाहेर पडू नये. ज्या भ्रष्टाचाराचा उद्घोष नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून केला तो अजित पवारांचा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा भाजपाला विसरता येणार नाही. कारण तो यूपीएच्या काळातलाच घोटाळा होता”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams pm narendra modi speech in rajyasabha targeting jawaharlal nehru pmw
Show comments