एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे भाजपात विलीन होऊन कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील. त्यांनी स्वतःला कितीही पदव्या लावून घेतल्या तरी काही उपयोग नाही. राजस्थान, मध्यप्रदेश तिथे जाऊन प्रचार करत आहेत. उद्या एकनाथ शिंदे जो बायडेनच्या प्रचारालाही जाऊ शकतात, कारण ते महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. २०१४ नंतर भाजपाने असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन तयार केले पण हे तात्पुरते आहेत. एवढंच नाही तर देशाला २०१४ मध्ये पनवती लागली जी २०२४ मध्ये संपणार आहे असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.
बेईमान आणि गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणायची नवी परंपरा
एकनाथ शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतील पण त्यांनी असं काय महान कार्य केलं आहे ते आम्हाला पाहावं लागेल. सन्मानीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलं आहे. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे खोके घेऊन प्रचाराला गेले
राजस्थान भाजपाला महाराष्ट्रात काय चाललंय हे कुठे ठाऊक आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील. महाराष्ट्रात ज्यांना पनवती समजलं जातं ते बाहेर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार करतात. हिंदूहृदयसम्राट या देशात दोनच आहेत, एक स्वातंत्र्यीवर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर कुणीही ही पदवी घेऊ शकत नाही. कारण त्यांचा संघर्ष आणि काम खूप मोठं होतं असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
२०२४ ला देशाला लागलेली पनवती दूर होणार
महाराष्ट्राची पनवती असलेले एकनाथ शिंदे बाहेर प्रचाराला जात आहेत. ते महाराष्ट्रातही हरणार आणि बाहेरही. २०१४ पासून देशाला पनवती लागली आहे. खासकरुन जे स्वतःला हिंदुत्व समजत आहेत त्यांना पनवती शब्दाबाबत अडचण वाटायला नको. जरा या शब्दाचा अर्थ समजून घ्या. भाजपाला या शब्दाचा राग यायला नको. २०१४ ला लागलेली पनवती २०२४ ला दूर होणार आहे. कधी साडेसाती लागते त्यानंतर पनवती लागते, त्यानंतर छोटी पनवती लागते. ही सगळी हिंदुत्वाची संकल्पना आहे. पनवतीचा अभ्यास हिंदुत्ववाद्यांनी करावा.
चार दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात दोन कॅप्टनसह चार जवानांना बलिदान द्यावं लागलं. याबाबत कुणीही संवदेना व्यक्त केली नाही. केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत आणि शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा होता पण ते झालं नाही. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद संपलेला नाही. कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहेत गृहमंत्री? असाही सवाल संजय राऊत यांनी विचारला.