आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या अगोदर शिवसेना नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे अयोध्येत पाहणी व तयारी आढावा दौऱ्यावर आहेत. यावेळी आज त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता, त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

अखेर मुहूर्त ठरला! १५ जून रोजी आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

संजय राऊत म्हणाले, “आज मी आणि एकनाथ शिंदे, वरूण सरदेसाई, सुरज चव्हाण, अनिल तिवारी असे सगळे लोक आम्ही इथे आलो. नवीन जागेत प्रभू श्रीरामाचं सध्या जे स्थान आहे तिथे दर्शन घेतलं. जिथे राम मंदिर निर्माण होतय, त्या जागेला भेट दिली. अत्यंत प्रसन्न वाटलं आणि १५ जून रोजी आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा आहे. त्याची तयारी करण्यासाठी मी आणि एकनाथ शिंदे येथे आलेलो आहोत. ”

तसेच, “आदित्य ठाकरे अयोध्येत येत असल्याने येथील लोकांमध्ये एक उत्साह आहे. मला असं वाटतं की १५ जून रोजी लखनऊ पासून अयोध्येपर्यंत तुम्हाला त्यांचं स्वागत होताना दिसेल, हे शक्तीप्रदर्न नाही. एक श्रद्धेचं दर्शन आहे, आमच्या भावना आहेत त्या आम्ही इथे व्यक्त करू. ” असं संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, “ब्रिजभूषण शरण हे एक मोठे नेते आहेत. आम्ही त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आमची मैत्री देखील आहे. परंतु इथे त्यांची जी एक चळवळ सुरू आहे. त्यांची भावना आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांच्या भावनेला त्यांनी एक मोठा आवाज दिला आहे. परंतु, त्यांच्या जळवळीशी आमचा संबंध नाही. १५ जून रोजी आदित्य ठाकरे लखनऊवरून अयोध्येला येतील, दर्शन घेतील, पत्रकार परिषदही घेतील आणि सांयकाळची शरयूची आरती देखील करतील. आम्ही अत्यंत श्रद्धापूर्व हे करू इच्छितोय, आम्हाला कोणतही राजकीय शक्तीप्रदर्शन करायचं नाही. ” असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.