शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या मुद्य्यांवर चर्चा झाली याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या भेटीबाबत थोडीफार माहिती दिली. मात्र, अद्यापही काही मुद्दे हे संजय राऊत यांनी उघड केलेले नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यावर ते बोलणार असल्याचं सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी तुम्हाला सांगेन. विरोधकांच्या बैठकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी राहुल गांधी यांना सांगितलं आहे की, तुम्ही याबाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही पुढे येऊन याबाबतीत उघडपणे काम केलं पाहिजे. काँग्रेसशिवाय एकजुट होऊ शकत नाही. जर कुणी अशाप्रकारे वेगळा फ्रंट निर्माण करेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वात दुसरा फ्रंट तर काम करेलच ना. त्यांच्यासोबत आजही अनेक राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत. मग विरोधकांचे तीन-तीन फ्रंट काय करतील?”
तर, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? आपली काय भूमिका आहे? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर संजय राऊत म्हणाले, “मुद्दा केवळ उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा नाही तर राष्ट्रीय राजकारणाचा आहे. मी केवळ म्हणतोय की विरोधकांचा एकच फ्रंट असायला हवा. नेतृत्वासंदर्भात एकत्र बसून तुम्ही चर्चा करू शकतात, मात्र जर का दोन-तीन फ्रंट तयार झाले तर हा पर्याय असू शकत नाही. आम्ही भूमिकेवर कायम आहोत. एकच फ्रंट बनेल, एकच फ्रंट बनला पाहिजे आणि जेव्हा एक फ्रंट बनेल, तेव्हाच आपण एक समर्थ पर्याय उभा करू शकतो. आम्ही सर्वजण एकसाथ आहोत, एकसाथ राहू.”
तसेच, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर संजय राऊत म्हणाले, “यासाठी शरद पवार पुरेस आहेत, मजबूत आहेत, मोठे नेते आहेत.” याचबरोबर, “राहुल गांधी जेव्हा मुंबईत येतील तेव्हा जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाज सुरू केलेलं असेल, तर नक्कीच या दोघांची भेट होईल. प्रियंका गांधी यांची मी उद्या भेट घेणार आहे.” अशी देखील यावेळी संजय राऊत यांनी माहिती दिली.