Eyewitness Of Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल रात्री महाकुंभमेळ्याला प्रयागराजला जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अशात ही गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेवेळी स्थानकावर असलेल्या संजय यांच्या बहिणीचा चेंगराचेगरीत मृत्यू झाला आहे. आज त्यांनी काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
तोपर्यंत तिने जीव…
एलएनजेपी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना संजय यांनी डोळ्यात अश्रू आणत सांगितले की, “आम्ही १२ जण एकत्र महाकुंभाला जात होतो. आम्ही पायऱ्यांवर होतो, पण प्लॅटफॉर्मवर पोहोचायच्या आधीच लोकांनी इकडे तिकडे धावायला सुरुवात केली आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये माझी बहीणही अडकली. अर्ध्या तासानंतर आम्हाला ती सापडली, पण तोपर्यंत तिने जीव सोडला होता, आता ती आमच्या नाहीये.”
शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ महिला आहेत.
पीडितांना मदत जाहीर
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेतील पीडित आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
जखमींवर उपचार सुरू
दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, मध्य दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात १८ पैकी १५ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते आणि दोन वगळता सर्व मृतांची ओळख पटली आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये किमान तीन मुले असल्याचे त्यांनी सांगितले. आतिशी म्हणाल्या की, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया
दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून सहानुभूति व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी घ्यावी.”