पीटीआय, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसून त्यांना जाळीच्या पलीकडूनच भेट घेता येत आहे, असे ‘आप’चे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. हा केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंह यांनी सांगितले की, ‘‘ केजरीवाल यांच्या कुटुंबीयांना त्यांची समोरासमोर भेट घेण्यास परवानगी दिलेली नाही. त्यांना केवळ जाळीच्या पलीकडूनच भेटू दिले जात आहे. हे अमानवी आहे. अगदी कट्टर गुन्हेगारांना समोरासमोर भेट घेऊ दिली जाते’’. ते पुढे म्हणाले की, ‘‘याच तिहार तुरुंगात अनेक भेटी होत असतात. पण तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांना अपमानित केले जात आहे आणि जाळीच्या पलीकडूनच भेट घेण्यास परवानगी देण्यात आली आहे’’. हे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच होत आहे, असा आरोप सिंह यांनी केला. केजरीवाल यांना कैदी म्हणून असलेले अधिकार हिरावून घेतले आहेत असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या

दिल्ली भाजपचे नेते वीरेंद्र सचदेव यांनी सिंह यांचे आरोप फेटाळले. ‘‘सिंह काही महिने तुरुंगात राहून अलीकडचे बाहेर आले आहेत, त्यांना तुरुंगाच्या नियमांची माहिती असायला हवी’’, अशी खोचक टीका त्यांनी केली.

कविता यांच्यावर रेड्डींना धमकावल्याचा आरोप

दिल्ली मद्या धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या बीआरएसच्या नेत्या के कविता यांनी ‘अरबिंदो फार्मा’चे प्रवर्तक शरत चंद्र रेड्डी यांना आपला २५ कोटी रुपये देण्यासाठी धमकावले होते असा दावा सीबीआयने शनिवारी विशेष न्यायालयासमोर केला. दिल्ली सरकारच्या मद्या धोरण प्रकरणात रेड्डी यांच्या कंपनीला वाटप करण्यात आलेल्या पाच किरकोळ विक्री विभागांसाठी हे पैसे देण्यास सांगण्यात आले होते असे सीबीआयचे म्हणणे आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, कविता यांनी रेड्डी यांना धमकी दिली की, दिल्लीत सत्ताधारी आपला रक्कम दिली नाही तर तेलंगण आणि दिल्लीमधील त्यांच्या व्यवसायाचे नुकसान होईल. या घोटाळा प्रकरणात रेड्डी हे आधी आरोपी होते. ईडीने त्यांची चौकशीही केली होती, त्यानंतर ते माफीचा साक्षीदार झाले. सीबीआयने अद्याप त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नाही.

‘अरबिंदो फार्मा’ने भाजपला निवडणूक रोख्यांद्वारे देणगी दिल्यामुळे आपने भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

Story img Loader