सरबजितसिंग मृत्यू प्रकरण
भारतीय कैदी सरबजितसिंग याच्या मृत्यूबाबत माहिती द्यावयाची असल्यास ती संबंधित दस्तऐवजासह येत्या सात दिवसांत ऑनलाइन दाखल करावी, असे आवाहन सरबजितसिंगच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाकिस्तानी न्यायमूर्तीनी भारतीय नागरिकांना केले आहे.
लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सय्यद मझहर अली अकबर नक्वी हे सरबजितसिंग याच्या मृत्यूची चौकशी करणार असून त्यांनी भारतीय नागरिकांना आवाहन केले आहे. त्यासाठी भारतीय नागरिकांना यूआरएल एचटीटीपी://एमएआयएल.पीयूएनजेएबी.जीओव्ही.पीके येथे एकसदस्यीय चौकशी लवादापुढे प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. तसेच ईमेल द्वारे आपले मत नोंदविण्यासाठी registrartribunals@lhc.gov.pk या ईमेल पत्त्याचा वापर करावा असे स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्तीना गरज वाटल्यास ते स्वत: भारत भेटीवर येऊ शकतात, असे न्यायमूर्तीचे खासगी अधिकारी रियाज अहमद यांनी सांगितले. लवादाने पाकिस्तानी नागरिकांनाही संबंधित दस्तऐवजासह ऑनलाइन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यासाठी त्यांना आपल्या राष्ट्रीय ओळखपत्राची प्रत जोडावी लागणार आहे.

Story img Loader