पाकिस्तानात मृत्युमुखी पडलेल्या शहीद सरबजित सिंगच्या पार्थिवावर शुक्रवारी त्याच्या गावी बिखिविंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दलबीर कौर यांनीच भावाच्या पार्थिवास मुखाग्नि दिला. गेल्या दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या सरबजितचा अखेर अत्यंत ह्रदयद्रावक ठरला. 
शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, परराष्ट्र राज्यमंत्री परणित कौर, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग यांच्यासह अन्य अनेक नेते उपस्थित होते. बिखिविंडसह पंजाबमधील अन्य अनेक गावांतून हजारोंचा जनसमुदाय सरबजितला अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जमला होता. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
अंत्यसंस्कारावेळी सरबजितची बहिण दलबीर कौर, पत्नी आणि मुलींना भावना अनावर झाल्या होत्या. सरबजितच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना या सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी पोलिस अधिकारी आणि उपस्थितांनी त्यांना शोक आवरण्याचा प्रयत्न केला.