गेल्या दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याची गुरुवारी अखेरीस मृत्यूनेच सुटका केली. आठवडाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज गुरुवारी पहाटे दीड वाजता संपली.
लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सरबजितवर मागील आठवडय़ात दोन कैद्यांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यात जबर जखमी झालेल्या सरबजितला येथील जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.
एअर इंडियाच्या विशेष विमानाने गुरुवारी सायंकाळी सरबजितचा मृतदेह अमृतसरला आणण्यात आला. या वेळी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल व परराष्ट्र राज्यमंत्री प्रीनित कौर उपस्थित होते. ऑटोप्सीसाठी सरबजितचा मृतदेह येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला व त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सरबजितवर शुक्रवारी त्याच्या मूळगावी बिखिविंड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. पंजाब सरकार तीन दिवसांचा दुखवटाही पाळणार आहे.

पाकिस्तानला जाग
सरबजितच्या मृत्यूनंतर आता जाग आलेल्या पाकिस्तान सरकारने त्याच्यावरील हल्ल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. पंजाब प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री नज्म सेठी यांनी हे आदेश दिले असून १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे. मात्र कोट लखपत तुरुंगातील अधिकाऱ्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. सरबजितवर हल्ला करणाऱ्या अमीर आफ्ताब आणि मुदस्सर या दोन कैद्यांनाही अद्याप काहीही शिक्षा झालेली नाही.

कुटुंबीयांचा आक्रोश
भारत-पाक सरकारांकडे सरबजितच्या सुटकेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सरबजितचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. दोन्ही देशांनी आपल्या भावाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप सरबजितची बहीण दलबीर कौर यांनी केला. सरबजितच्या सुटकेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या दलबीर यांनी पाकिस्तानवर आरोपांचा भडीमार केला. तेथील सातत्याने बदलणाऱ्या सरकारांनी सरबजितच्या सुटकेची आशाच दाखवली. प्रत्यक्षात काहीच केले नाही असे त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांना दुख
सरबजित जिवंत असताना त्याच्या सुटकेसाठी फारशी काहीच हालचाल न करणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र सरबजितच्या मृत्यूनंतर त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, ‘सरबजित हा भारतमातेचा एक शूरपुत्र होता. त्याच्या मृत्यूने अतीव दुख झाले आहे. सरबजितवर तुरुंगात ज्यांनी हल्ला केला त्यांना पाक सरकारने अत्यंत कठोर शिक्षा करावी’. दरम्यान, पंतप्रधान मदतनिधीतून सरबजितच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य़ घोषित करण्यात आले.