लाहोरमधील रुग्णालयात उपचार सुरू असलेला सरबजितसिंग याची प्रकृती आणखी खालावली असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिली. त्याचबरोबर त्याला अद्याप ब्रेन डेड म्हणून जाहीर करण्यात आलेले नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरबजितच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी त्याची बहीण दलबीर कौर भारतात परतण्याची शक्यताही वर्तविण्यात येते आहे. दरबीर कौरने त्यांचे वकील एवैस शेख यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांच्याकडे भारतात परतण्याबद्दल विचारणा केली.
पाकिस्तानी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सरबजितसिंगवर इतर कैद्यांनी हल्ला केला होता. हल्लामध्ये गंभीर जखमी झालेल्या सरबजितची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. सरबजितवर हल्ला झाल्यानंतर रविवारी त्याचे कुटुंबिय लाहोरमध्ये गेले होते.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १९९० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याच्या संशयावरून सरबजितला अटक करण्यात आली असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरबजितचा दयेचा अर्ज पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय तसेच तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी फेटाळून लावला आहे. सरबजितने शेतात काम करताना चुकून सीमारेषा पार केली तसेच त्याला गैरसमजातून अटक करण्यात आल्याचा दावा त्याचे कुटुंबीय पहिल्यापासून करीत आहेत.