भारताचा हेर असल्याच्या संशयावरून पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची अज्ञातांकडून गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी सरबजित यांची मुलगी स्वप्नदीप यांनी प्रतिक्रिया दिली. अमीर सरफराज हत्येप्रकरणी त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरीही सरबजित सिंगच्या हत्येप्रकरणी त्यांना अजूनही खटला सुरू ठेवायचा आहे.
सरफराजच्या मृत्यूच्या वृत्तावर स्वप्नदीप म्हणाल्या, सुरुवातीला मला समाधान वाटले. पण नंतर मला वाटलं की हा न्याय नाही. पप्पांच्या निर्घृण हत्येत तीन ते चार लोक सामील होते. त्यामुळे अमीरची हत्या करून हा कट लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा >>सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
वडिलांनी पाठवलेल्या शेवटच्या पत्रांचा उल्लेख करत स्वप्नदीप म्हणाल्या, सरबजित यांनी त्यांना दिले जात असलेल्या स्लो पॉयजनबद्दल लिहिले होते. त्यांना तुरुंगात अमानुष वागणूक दिली होती.
“येथील तुरुंग अधिकारी मला सांगतात की तुमची हाडे भारतात परत जातील. आम्ही तुम्हाला जवंत परत जाऊ देणार नाही. संपूर्ण भारत तुमच्यासाठी खूप लढत आहे. त्यामुळे आम्हाला ते शक्य नाही, असं सरबजित यांनी पत्रात लिहिलं होतं”, असं स्वप्नदीप यांनी सांगितलं. तसंच, सरबजित यांनी एक डायरीही लिहीली होती. यामध्ये तुरुगांत होत असलेल्या गोष्टींबद्दल तपशीलवार लिहिले होते. परंतु, ही डायरी वडिलांच्या मृतदेहाबरोबर पाठवण्यात आली नाही”, असंही त्यांनी म्हटलं.
सरबजित सिंग यांचं नेमकं प्रकरण काय?
शेतकरी असलेले सरबजित सिंग हे भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावचे रहिवासी होते. ३० ऑगस्ट १९९० मध्ये ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले.
लाहोर आणि फैसलाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचं खापर त्यांच्यावर फोडण्यात आलं. या प्रकरणात त्यांना आरोपी बनवण्यात आलं. या बॉम्बस्फोटात जवळपास १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. या बॉम्बस्फोटाप्रकरणी त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षाही सुनावली होती. परंतु, फाशीच्या शिक्षेआधीच तुरुंगातील इतर कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना ब्रेड डेड घोषित करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या सुटकेसाठी भारताकडूनही प्रयत्न सुरू होते. परंतु, या प्रयत्नांना यश आले नाही. आता ज्याने सरबजित यांची हत्या केली त्या अमीर सरफराज याचीही हत्या करण्यात आली आहे.