कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) कायद्याचे फास आवळण्यास सुरुवात केली असून तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजय बोस यांना पाच तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर शुक्रवारी अटक करण्यात आली. या घोटाळ्यात बोस यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. बोस यांनी अलीपूर न्यायालयात शनिवारी हजर करण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालचे वस्त्रोद्योगमंत्री श्यामपद मुखर्जी तसेच तृणमूल काँग्रेसचेच माजी खासदार सोमेन मित्रा यांचीही सीबीआयने चौकशी केली.
बंगाली वृत्तपत्राचे मालक असलेल्या बोस यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. ‘शारदा रिआलिटी’ प्रकरणी बोस हे दोषी असल्याचे सकृतदर्शनी आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फौजदारी कटकारस्थान तसेच निधीचा गैरव्यवहार आदी आरोपही त्यांच्याविरोधात ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आर्थिक सवलतींचाही बोस यांनी गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या एकूणच कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण शुक्रवारी बऱ्यापैकी ढवळून निघाले होते.
दरम्यान, आपण साक्षीदाराच्या भूमिकेतून येथे आलो असून आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नसल्यामुळे आपल्याला कोणतीही काळजी नाही, असे बोस यांनी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.
शारदा घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारास अटक
कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) कायद्याचे फास आवळण्यास सुरुवात केली असून तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजय बोस यांना पाच तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर शुक्रवारी अटक करण्यात आली.
First published on: 22-11-2014 at 05:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saradha scam bengal minister trinamool mp interrogated by cbi