विमान प्रवासादरम्यान सामान न सापडण्याचा अनुभव सामान्य प्रवाशांना अनेक वेळा येतो. अशीच काहीशी परिस्थिती केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांच्यावर ओढवली. अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने २० ते २१ सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियातील केर्यंस शहरात होणाऱ्या ‘जी-२०’ देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाने त्या केर्यंसला रवाना झाल्या. प्रवासादरम्यान कपड्यांनी भरलेली त्यांची बॅग गायब झाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला. सिडनीला उतरून पुढील विमानप्रवास करण्यासाठी सज्ज झालेल्या निर्मला सितारामन यांना कपड्यांनी भरलेली त्यांची बॅग गहाळ झाल्याचे लक्षात आले. कपड्यांनी भरलेली बॅग गहाळ झाल्याने त्रस्त झालेल्या निर्मला सितारामन यांनी आपला सर्व त्रागा टि्वटरवर व्यक्त केला. या प्रकारामुळे त्या जी-२० परिषदेच्या स्वागत समारंभाला हजेरी लावू शकल्या नाहीत.