जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. केंद्रशासित प्रदेश म्हणून गुरुवारपासून (३१ ऑक्टोबर) अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत. ते ११९५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सतिश खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यत जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला. २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून खंदारे यांनी कार्यभार सांभाळला.

सतीश श्रीराम खंडारे यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झालं. दहावीची परिक्षा त्यांनी १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले.

आर. के. माथुर लडाखचे पहिले नायब राज्यपाल
माजी संरक्षण सचिव आर. के. माथुर यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून गुरुवारी शपथ घेतली. माथुर हे त्रिपुराचे १९७७ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. माथुर २०१५ मध्ये संरक्षण सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची मुख्य माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या. अविभक्त जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट मागे घेतल्याची पहिली आणि जम्मू-काश्मीरमधील प्रशासनावर नायब राज्यपालांमार्फत नियंत्रण ठेवण्याची दुसरी अधिसूचना जारी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish khanadre ladakh police director general nck