सत्ता येते जाते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजून घेतले पाहिजे, असा सल्ला मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे. देशात अनेक प्रकारच्या लढाया सुरु होणार आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यास, तरुणही केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, असेही सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.

सत्यपाल मलिक हे रविवार ( २० नोव्हेंबर ) राजस्थान विश्वविद्यालय छात्र संघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदींनी समजले पाहिजे की सत्ता येते जाते. इंदिरा गांधी यांचीही सत्ता गेली होती. पण, लोक बोलायचे त्यांना कोणी हटवू शकत नाही. एक दिवस तुम्ही सुद्धा निघून जाल. त्यामुळे परिस्थिती एवढीही नका बिघडवू की ती सुधरता येईल,” असे मलिक यांनी म्हटलं.

हेही वाचा : “महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवली,” तुषार गांधी यांचा मोठा आरोप; म्हणाले “हत्येच्या दोन दिवस आधी…”

‘अग्निपथ’ योजनेवरूही सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “अग्निपथ योजनेमुळे सैन्य कमकूवत होऊ शकते. तीन वर्षांची सेवा देताना सैनिकांना त्यागाची भावना राहणार नाही. अग्निवीर सैनिकांना ब्रम्होस्त्र सह अन्य क्षेपणास्त्रे आणि शस्त्र्यांना हात लावण्याची परवनागी दिली जाणार नाही. त्यामुळे ‘अग्निपथ’ ही योजना सैन्याची नासधूस करत आहे,” असेही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.