जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गंभीर दावे केले आहेत. करण थापर यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये भाजपा नेते आणि गोवा तसेच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. त्यासोबतच त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीही माहिती नाही, ते आपल्याच धुंदीत आहेत, असं म्हटलं आहे.
“पुलमावा आमच्या चुकीमुळे घडलं”
पुलवामा हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि सीआरपीएफ व्यवस्थापन असे दोघे जबाबदार असल्याचं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. “सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही.पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”, असं सत्यपाल मलिक म्हणाले.
“पोलीस बंडाच्या भीतीमुळेच काश्मीर केंद्रशासित”
दरम्यान, काश्मीरमधील पोलिसांच्या बंडाची भीती असल्यामुळेच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केल्याचा दावाही सत्यपाल मलिक यांनी केला. “काश्मीरमधील जनतेला ३७० कलम हटवण्यापेक्षा राज्य केंद्रशासित प्रदेश केलं याचं जास्त वाईट वाटलं. यातही माझा सल्ला घेतला गेला नाही. सल्ला घेतला असता तर मी सांगितलं असतं की हे नका करू. राज्य केंद्रशासित प्रदेश केलं तर तिथले पोलीस थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. नाहीतर पोलीस राज्य सरकार किंवा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात, म्हणून हा निर्णय घेतला गेला असं मला वाटतं. तेव्हा अशी भीती होती की तिथले पोलीस बंड करू शकतात”, असं ते म्हणाले.
यावेळी बोलताना सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काही मोठी विधानं केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सगळ्या जगाचं जे मत आहे ते माझं नाही. मी त्यांना जेव्हा केव्हा भेटलो, तेव्हा मला जाणवलं की त्यांना अजिबात काही माहिती नाही. मी एकदा उदाहरण म्हणून सांगितलं की काश्मीरमधली खरी समस्या जमात आहे. त्यांना त्याची काही काळजीच नव्हती. त्यांनी म्हटलं मला त्यावर एक टिप्पण द्या. मी त्यावर २० पानांचं टिप्पण दिलं. पण त्यावर त्यांनी काहीच पावलं उचलली नाही. अमित शाहांनी त्यावर कारवाई केली”, असं मलिक या मुलाखतीत म्हणाले.
“काश्मीर प्रश्न सोडवण्यास मोदी इच्छुक नव्हते”
“जमात खूप शक्तीशाली आहे. सरकारमधले २०-३० टक्के कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत. पण मोदींना काहीच माहिती नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. काश्मीरच्या खऱ्या समस्येबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यांना तर हेही माहिती नव्हतं की हुर्रीयत कसं काम करते. मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते”, असा दावाही त्यांनी केला.