चार राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी मध्य प्रदेशातील पराभवाला सरचिटणीस दिग्विजय सिंह यांना जबाबदार धरले आहे. जनतेने नाकारलेल्या दिग्विजय सिंह आणि त्यांच्या चौकडीच्या नकारात्मक आणि विघातक राजकारणाला जनता स्वीकारत नाही. लोकांनाही त्यांना मते द्या, असे आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार, अशा शब्दांत चतुर्वेदी यांनी आपल्या असंतोषाला वाट करून दिली आहे. नरेंद्र मोदी फुटीरतावदी राजकारण करतात असा आरोप दिग्विजय सिंह करत होते. आता हाच आरोप त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर केला आहे हे विशेष.
मध्य प्रदेशातील जनतेने दिग्विजय सिंह यांना यापूर्वीच घरी बसवले आहे. आता पुन्हा त्यांनाच पुढे करून काँग्रेसला कसे यश मिळणार, असा सवाल चतुर्वेदी यांनी विचारला आहे. ज्योतिर्दित्य शिंदे यांना प्रचारप्रमुखपदी नेमण्यात खूपच उशीर झाल्याचे खापरही त्यांनी पक्षनेतृत्वावर फोडले.
 प्रदेश काँग्रेस समितीही फारशी सक्रिय नव्हती. उमेदवारी वाटपही अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केला. जे उमेदवार जाहीर केले ते सुमार दर्जाचे होते. निवडणुकीसाठी तीन महिने आधीच उमेदवार घोषित केले जातील हे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जयपूर अधिवेशनात जाहीर केले होते. मात्र ते केवळ कागदावरच राहिल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली.
केंद्र सरकारकडून कार्यकर्त्यांना कुठलेही बळ मिळाले नाही. ज्या कल्याणकारी योजना जाहीर केल्या त्याही निवडणुकीसाठी केल्याची भावना जनतेत निर्माण झाल्याचा निष्कर्ष चतुर्वेदी यांनी काढला. भाववाढ आणि भ्रष्टाचार हे दोन मुख्य मुद्दे निवडणुकांमध्ये होते हे त्यांनी मान्य केले.
संवादकौशल्यात नरेंद्र मोदींच्या तोडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसने जाहीर करावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री असलेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केली आहे. तरच जनता आपली भूमिका ऐकेल. दिल्लीतल्या पराभवाचे खापर शीला दीक्षित यांच्यावर फोडण्यात आले आहे. त्यांनी दिल्ली काँग्रेस समितीच्या शिफारसींना न जुमानता कारभार केल्याचा आरोप पक्षातून होत आहे. आरोप असलेल्या २० आमदारांना उमेदवारी देणे किंवा प्रचारात पक्ष संघटनेला शीला दीक्षित यांनी डावलल्याचे आरोप पक्षातून सुरू आहेत. पराभवाची जबाबदारी झटकण्याची स्पर्धा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत काँग्रेसचे नेतृत्व काय उपाययोजना करते हे अजून स्पष्ट झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा