येमेनमधल्या एका गावावर रविवारी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली फायटर विमानांनी हवाई हल्ला चढवला. या कारवाईत २० नागरीक ठार झाले. स्थानिक रहिवाशी आणि वैद्यकीय सूत्रांनी ही माहिती दिली. गावात विवाहसोहळा सुरु असताना अचानक हा हवाई हल्ला झाला. विवाहसोहळयाला उपस्थित असणाऱ्या वहाऱ्डी मंडळींना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.

रुग्णालयात ४० मृतदेह आणण्यात आले. अनेकांच्या शरीराचे तुकडे झालेले होते. या हल्ल्यात ४६ जण जखमी झाले असून यात ३० लहान मुलांचा समावेश आहे अशी माहिती अल जुमहोयुरी रुग्णालयाच्या प्रमुखांनी दिली. येमेनमधील हाऊथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाचे मागच्या तीनवर्षांपासून युद्ध सुरु आहे. उत्तर येमेनमधील बहुतांश भागावर हाऊथी बंडखोरांचे नियंत्रण आहे.

सौदी अरेबियाच्या या आक्रमक भूमिकेला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा आहे. सौदी अरेबियाच्या या दीशाहीन हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत रुग्णालय, शाळा आणि बाजारपेठेतील अनेक निष्पाप नागरीकांनी आपले प्राण गमावले आहेत. अल मासीराह या वृत्तवाहिनीने टि्वटरवरुन सौदीच्या हवाई हल्ल्यात ३३ नागरीकांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. अल मासीराह हाऊथी बंडखोरांची वाहिनी आहे.

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली कारवाई करणाऱ्या फौजांनी सामान्य नागरीकांना लक्ष्य करायचा आपला उद्देश नव्हता. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करु असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार येमेन युद्धात आतापर्यंत १० हजार नागरीकांचा मृत्यू झाला असून २० लाख लोक विस्थापित झाले आहेत.

 

Story img Loader