सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमध्ये बंडखोरांच्या छावण्यांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. येमेनचे अध्यक्ष अबेड्राबो मनसौर हादी यांचे अरब मित्र देशांशी चर्चेसाठी इजिप्तमध्ये आगमन झाले आहे.
दरम्यान येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना विमानाने भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केरळचे मुख्यमंत्री ओमेन चँडी यांनी तिरूअनंतपुरम येथे पत्रकारांना सांगितले.
गेल्या महिनाभर शिया बंडखोरांनी येमेनमध्ये धुडगूस घातला असून आता खंगलेला येमेन हा युद्धाच्या उंबरठय़ावर उभा आहे. येमेन हा अरबी द्वीपकल्पातील दक्षिण टोकाचा देश आहे. सुन्नींची सत्ता असलेल्या सौदी अरेबियाने हादी यांना परागंदा करण्यात आल्यानंतरही त्यांच्या बाजूने उभे ठाकण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणने आक्रमण केल्याचा आरोप
शिया पंथीयांचे प्रमाण अधिक असलेल्या इराणने एक प्रकारे आक्रमणच केल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला असून इराणने हुथी बंडखोरांना पाठिंबा दिल्याचेही म्हटले आहे.
हवाई हल्ल्यात आतापर्यंत ३९ नागरिक ठार झाले असून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने ऑपरेशन डिसीसीव्ह स्टॉर्म ही मोहीम हुथई व इतर बंडखोरांविरोधात राबवली आहे.
उत्तरेकडील लष्करी तळावर निवासी क्षेत्रात केलेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले असून पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यात दक्षिण सनामधील राजप्रासाद काबीज करणाऱ्या बंडखोरांना मोठा फटका बसला आहे.
लढाऊ विमानांनी हुथी बंडखोरांचे नियंत्रण असलेल्या ठिकाणांवर हल्ले केले त्यात सनाच्या उत्तरेला असलेल्या शस्त्रागारांचा समावेश आहे.
अबेड्राबो हादी इ्जिप्तमध्ये
हादी यांना पश्चिमी देश व अरब आखाती देशांचा पाठिंबा असून ते इजिप्तमध्ये अरब राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी गेले आहेत. शर्म अल शेख येथील रेड सी रिसॉर्ट येथे ही परिषद होत आहे. काल ते रियाधला आले व तेथून इजिप्तला रवाना झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा