बंडखोरांचा बऱ्याच प्रमाणात खात्मा केल्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली महिनाभरापूर्वी येमेनमध्ये सुरू करण्यात आलेले हवाई हल्ले थांबवण्यात आले आहेत मात्र पायदळाची कारवाई सुरूच राहणार असल्याचे समजते, त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेने त्यांच्या काही युद्धनौका जवळ आणून ठेवल्या आहेत.
येमेनी सरकार व अध्यक्ष अबेड्राबो मनसूर हादी यांनी केलेल्या विनंतीवरून हल्ले थांबवण्यात येत आहेत असे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अहमद अल असिरी यांनी रियाध येथे सांगितले. दरम्यान येमेनची नौदल नाकेबंदी चालूच राहणार असून शिया हुथी बंडखोरांच्या कारवायांना लक्ष्य केले जाणार आहे. सौदी आघाडीने म्हटले आहे की, पुढील टप्प्यात येमेनमध्ये राजकीय प्रक्रिया सुरू केली जाईल व तेथे मदत सुरू केली जाईल.
अल् काईदाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या देशात दहशतवादाविरोधात लढाई सुरू राहील. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सौदी अरेबियाच्या सुरक्षेला असलेला धोका कमी झाला आहे, आता शेजारी देशांनाही फार धोका नाही. २६ मार्चला येमेनवर कारवाईसाठी ऑपरेशन डीसीसीव्ह स्टॉर्म सुरू करण्यात आले होते.

Story img Loader