सौदी अरेबियात देशातलं पहिलं वाईन शॉप सुरु होणार आहे. देशाची राजधानी असलेल्या रियाध या ठिकाणी हे वाईन शॉप सुरु होणार आहे. मुस्लीम धर्मीय वगळून इतर सर्वधर्मीयांना या शॉपमध्ये मद्य मिळणार आहे. तसंच मद्य खरेदीसाठी ग्राहकांना मोबाईल अॅपवरुन नोंदणी करावी लागणार आहे. तसंच परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना क्लिअरन्स कोड प्राप्त करावा लागणार आहे. महिन्यातल्या कोट्या प्रमाणे मद्य मिळू शकणार आहे.
इस्लाममध्ये मद्य प्राशन करणं हा गुन्हा मानला जातो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वात सरकारने व्हिजन २०३० योजनेच्या अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अर्थव्यवस्था उभारण्यासाठी ही योजना आहे. त्या अंतर्गत सौदी अरेबियात पहिलं वाईन शॉप सुरु होणार आहे तिथे मुस्लीम वगळून इतर धर्मीयांना मद्य मिळू शकणार आहे.
रियाधच्या डिप्लोमॅट क्वार्टरमध्ये हे नवं वाईन शॉप उघडलं जाणार आहे. या भागांमद्ये विविध देशांचे दूतावास आहेत. डिप्लोमॅट किंवा ज्यांना राजदूत म्हटलं जातं ते याच भागात राहतात. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हा निर्णय घेणं महत्त्वाचं मानलं जातं आहे.
येत्या काही आठवड्यांमध्ये हे वाईन शॉप सुरु होईल अशी अपेक्षा आहे. सौदी अरेबियात मद्य प्राशनाविरोधात कठोर कायदे आहेत. चाबकाचे फटके, राज्यातून हद्दपार करणं, दंड आणि कारावास अशा शिक्षा आहेत. अनेकदा विदेशी लोकांनाही या शिक्षांचा सामना करावा लागतो. चाबकाने फटके देण्याची शिक्षा तूर्तास तुरुंगवासाच्या शिक्षेत बदलण्यात आली आहे. अशा सगळ्या वातावरणात या ठिकाणी वाईन शॉप सुरु होतं आहे. सुधारणेच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल मानलं जातं आहे.