Saudi Arabia On Pakistan : धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या वाढत्या संख्येबाबत सौदी अरेबियाने पाकिस्तानला इशारावजा धमकी दिली आहे. धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली देशात येतात आणि नंतर भीक मागतात, असं सांगत सौदीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला त्या नागरिकांना थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, असं न झाल्यास पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे.
सौदी अरेबियाने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर पाकिस्तानने स्पष्टीकरण देत उमरा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींचे नियमन करण्यासाठी उमरा कायदा आणण्याची योजना असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी सौदीचे राजदूत नवाफ बिन सईद अहमद अल-मल्की यांना आश्वासन दिलं की, “कठोर उपाययोजना अंमलात आणल्या जातील.” दरम्यान, यासंदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
दरम्यान, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (एफआयए) कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानी सेक्रेटरी अर्शद महमूद यांनी नोंदवलं होतं की, अनेक आखाती देशांनी काही पाकिस्तानी नागरिकांच्या वर्तनाबद्दल, विशेषत: कामाची नैतिकता, वृत्ती आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच परदेशी पाकिस्तानी आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात पकडले गेलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. अनेकदा भिकाऱ्यांशी संबंधित टोळ्या पकडल्या गेल्या आहेत.
पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया त्रस्त
धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबियातील विविध शहरात येतात आणि नंतर भीक मागतात, अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सौदी अरेबियाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात पाकिस्तानला इशारावजा धमकी सौदी अरेबियाने दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या सौदी अरेबियामध्ये वाढल्यामुळे सौदी अरेबिया त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.