पीटीआय, दुबई : सौदी अरेबियातील न्यायालयाने पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या एका महिलेला तब्बल ३४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तिचा गुन्हा काय तर तिने देशातील असंतुष्ट आणि लोकशाही समर्थकांना फॉलो केले आणि त्यांच्या पोस्ट रिट्वीट केल्या. तिने अफवा पसरवल्या असून राष्ट्रविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली.
सलमा अल- शेहाब असे या महिलेचे नाव असून ती दोन मुलांची आई आहे. ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठात ती संशोधक म्हणून काम करते, तसेच तिथे पीएचडी करत आहेत. सुट्टीमध्ये त्या मायदेशी आल्या होत्या. मात्र त्यांच्याविरोधात खटला भरवण्यात आला आणि त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. सौदी अरेबियामध्ये असलेल्या लोकशाही समर्थकांचे ट्वीट त्यांनी रिट्वीट केले. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला असून त्यांच्या या कृत्यामुळे राष्ट्रहिताला बाधा निर्माण झाली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना ३४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय त्यांना परदेशी प्रवास करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सलमा यांचे ट्विटरवर २६०० फॉलोअर्स असून सौदी अरेबियासारख्या मुस्लीम देशांत त्या वारंवार ट्विटरच्या माध्यमातून महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवत आहेत.
मानवी हक्क संघटनांचा निषेध
समाजमाध्यमांवर सरकारविरोधी आवाज उठवल्याने एका महिलेला ३४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने जगभरातील मानवी हक्क संघटनांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. ‘‘शांतताप्रिय कार्यकर्त्यांसाठी सौदी अरेबिया सरकारने दिलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे,’’ असे मत लंडन येथील एएलक्यूएसटी या संघटनेने व्यक्त केले. महिलांविषयक कायदे आणि एकूणच कायदा पद्धतीत सुधारण करण्याचा दावा वारंवार सौदी प्रशासनाकडून केला जातो, मात्र या शिक्षेमुळे सौदी प्रशासनाचा हा दावा म्हणजे थट्टा आहे, असे एएलक्यूएसटी संघटनेच्या संवादप्रमुख लिना अल- अॅथलॉल यांनी सांगितले.