Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. मुस्कान रस्तोगी नामक महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट ओतलं. एवढंच नाही तर यानंतर मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे त्यानंतर हिमाचल प्रदेशला फिरायला गेले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बेड्या ठोकल्या आहेत.

सौरभ राजपूतच्या हत्येच्या घटनेबाबत आता अनेक भयानक खुलासे समोर येत आहेत. शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हत्या करताना मुस्कान रस्तोगी तिच्या बेशुद्ध पती सौरभ राजपूतच्या छातीवर बसली होती, तेव्हा तिचा प्रियकर साहिल शुक्लाने तिला चाकू दिला आणि सौरभच्या छातीत तीन वेळा वार करण्यासं सांगितलं होतं. राजपूतच्या छातीत तीन वेळा वार करण्यात आले होते, अशी माहिती आता शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

सौरभ राजपूतची हत्या करताना त्याची पत्नी मुस्कान घाबरत होती. मात्र, तेव्हा तिचा प्रियकर साहिलने तिचा हात धरला आणि बेशुद्ध सौरभच्या छातीवर तीन वार करायला लावल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. तसेच सौरभ राजपूतची मान कापलेली, त्याचे पाय कापलेले आणि धड तुटलेले होते, अशी माहिती शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

शवविच्छेदनात असं आढळून आलं की, मारेकऱ्यांनी सौरभ राजपूतवर चाकूने क्रूरपणे वार केले होते. छातीवर इतक्या जोरात वार करण्यात आले होते की चाकू आत खोलवर घुसला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. पाय मागे वाकलेले होते, इतके कडक झाले होते की ते सरळ करता येत नव्हते आणि शरीराचे तुकडे झाले होते. मान वेगळी झाली होती, हात कापले गेले होते आणि धड वेगळे झाले होते, असं एका डॉक्टरांनी सांगितलं.

कोण आहे मुस्कान रस्तोगी?

मुस्कान रस्तोगी २७ वर्षांची असून २०१६ साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले होते. दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानने २०१९ साली एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले. मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.

Story img Loader