दहशतवादी हल्ल्यातून दुसऱ्यांदा वाचलेल्या अब्दुल वासी मिर्झा या तेवीस वर्षीय बेरोजगार युवकाचे पोलिसांनी जाबजबाब घेतले पण त्याच्यावर कुठलाही संशय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त अनुराग शर्मा यांनी सांगितले, की चौकशीचा भाग म्हणून आम्ही इतरांसमवेतच मिर्झा याचे जाबजबाब घेतले आहेत.
मिर्झा हा या स्फोटातील संशयित आहे काय असे विचारले असता ते म्हणाले, की तसे काही नाही. प्रसारमाध्यमांनी असा दावा केला आहे, की अब्दुल वासी मिर्झा याचा दोन्ही बॉम्बस्फोटात हात असल्याचा संशय असून त्यामुळेच पोलिसांनी त्याचे जाबजबाब घेतले.
मिर्झा हा मक्का मशीद स्फोटात मे २००७ मध्ये जखमी झाला होता, आता दिलसुखनगर येथील स्फोटातही तो जखमी झाला आहे. सध्या मलकापेट भागात यशोदा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सायबराबाद व हैदराबाद पोलिसांनी स्फोटाच्या प्रकरणात स्थानिक युवकांचे जाबजबाब घेतले. माध्यमांच्या वृत्तानुसार काही जणांना ताब्यात घेण्यात आले पण त्याबातम्या निराधार आहेत. काहींना केवळ जाबजबाबासाठी बोलावले होते असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनआयएच्या पथकाने दहशतवादाच्या आरोपावरून चंचलगुडा येथील तुरुंगात असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. दोन स्फोटाचे दुवे जुळवण्यासाठी एनआयएच्या व्यक्तींनी काहींचे जाबजबाब घेतले. दिलसुखनगर येथील बस स्टँडवर असलेल्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यांच्या फुटेजचा पोलिसांनी अभ्यास केला. आम्ही अजूनही तपशिलाचे विश्लेषण करीत आहोत असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी हैदराबाद येथे दिलसुखनगर भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात १६ ठार तर १२० जण जखमी झाले आहेत.
हैदराबादमधील स्फोटाच्या तपासात सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकही दाखल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा