स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे. स्टेट बँकेने आता आपल्या ग्राहकांना उत्सवांच्या निमित्ताने ऑफर देण्याची घोषणा केली आहे. सणांच्या काळात गृहकर्ज अधिक किफायतशीर करणं हा या ऑफर मागचा मुख्य उद्देश आहे. या ऑफरनुसार, स्टेट बँक आपल्या ग्राहकांना फक्त ६.७० टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा असणार नाही. स्टेट बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, एसबीआय सध्या ७.१५ टक्के व्याज दराने ७५ लाखांहून अधिक गृहकर्ज देतं. पण उत्सवांच्या ऑफर्स सुरू झाल्यानंतर ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त गृहकर्ज घेणाऱ्या कर्जदारांना किमान ६.७% दराने गृहकर्ज मिळेल.
प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, या ऑफर अंतर्गत, कर्जदारांना ३० वर्षांसाठी ७५ लाख रुपयांचं गृहकर्ज घेणाऱ्यांना ०.४५% स्वस्त कर्ज मिळेल. ज्यामुळे या संपूर्ण कालावधीत त्यांची ८ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत होईल.
नॉन-सॅलरीड वर्गालाही स्वस्त कर्ज
वेतन नसलेल्या कर्जदारांना अर्थात नॉन-सॅलरीड वर्गाला लागू असलेला व्याज दर हा पगारदार वेतनदारांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा ०.१५ टक्के जास्त असायचा. स्टेट बँकेने म्हटलं आहे की, या ऑफरअंतर्गत वेतनदार आणि वेतन नसलेले यांच्यातील भेद दूर करण्यात आला आहे.
स्टेट बँकेकडून प्रक्रिया शुल्क माफ
भारतीय स्टेट बँकेने प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केलं आहे. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित सवलतीच्या दराने आकर्षक व्याज देईल. स्टेट बँकेने सांगितलं की, आम्ही यावेळी ऑफर अधिक समावेशक बनवल्या आहेत. कर्जदारांच्या कर्जाची रक्कम आणि व्यवसाय काहीही असो सर्व प्रकारच्या कर्जदारांसाठी ही ऑफर उपलब्ध आहेत. ६.७०% गृहकर्ज ऑफर ही बॅलन्स ट्रान्स्फरच्या प्रकरणांवर देखील लागू आहे.
स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग), सीएस सेट्टी म्हणाले की, “आम्हाला विश्वास आहे की शून्य प्रक्रिया शुल्क आणि सवलतीच्या व्याजदरामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृह खरेदी अधिक किफायतशीर ठरेल.” स्टेट बँकेने बेस रेट आणि प्राईम लेंडिंग रेटमध्ये देखील कपात केली आहे. स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, १५ सप्टेंबर २०२१ पासून स्टेट बँकेचा बेस रेट ७.४५% आणि प्राइम लेंडिंग रेट १२.२ % असेल.