Fake SBI Branch : गेल्या काही दिवसांपासून अनेक फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बँक व्यवहारही जपून करावे लागतात. आर्थिक घोटाळ्यांची तर गिनतीच नाही. पण या सर्व फसवणुकींच्या प्रकरणांनाही लाजवेल किंवा आजवर नोंदवलेली सर्वांत धाडसी फसवणूक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे, गुन्हेगारांनी अत्यंत सावधपणे योजना आखून मोठ्या प्रमाणात बँकिंग फसवणूक केली आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची बनावट शाखा तयार केली. या घोटाळ्यामध्ये बेकायदेशीर नियुक्ती, बनावट प्रशिक्षण सत्रे, बेरोजगार व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक करण्यासाठी विस्तृत सेटअप तयार करण्यात आले होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर, सक्ती जिल्ह्यातील छपोरा नावाच्या शांत गावात देशातील सर्वात मोठी बँक SBI बँकेची बनावट शाखा तयार करण्यात आली. फक्त १० दिवसांपूर्वी उघडलेल्या ही शाखा खरोखरची बँक वाटावी याकरता एकदम चपखल बँकेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. नवीन फर्निचर, व्यावसायिक कागदपत्रे आणि कार्यरत बँक काउंटर या बँकेत होते. तर, अनेक गावकरी खाती उघडण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी या बँकेला भेट देऊ लागले. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही नामांकित बँकेत नोकरी मिळाल्याने आनंद झाला होता.
परंतु, चोर कुठेतरी एखादा पुरावा सोडतोच, तसंही या घटनेत झालं. बाजूच्या डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाला या शाखेविषयी संशय आला. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस आणि एसबीआय अधिकारी उपस्थित झाले. त्यांनी केलेल्या चौकशीतून ही शाखा बनावट असल्याचं स्पष्ट झालं. तसंच, या शाखेसाठी केलेल्या कर्मचारी नियुक्त्याही बनावट होत्या.
वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश पटेल म्हणाले, “डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाने छापोरा येथे कार्यरत असलेल्या एका बनावट बँकेच्या संशयाबद्दल आम्हाला माहिती दिली. तपासाअंती, बँक बनावट असल्याचं स्पष्ट झालं आणि अनेक कर्मचाऱ्यांची बनावट कागदपत्रांसह नियुक्ती करण्यात आली होती.”
कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर्स मिळाले
बँकेत मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, कॉम्प्युटर ऑपरेटर आदी पदे भरावी लागतात. या शाखेतील व्यवस्थापकानेही बनावट ऑफर लेटर देऊन ही पदे भरली. पण ही पदे भरतानाही मोठा भ्रष्टाचार केला. २ ते ६ लाखांपर्यंतची लाच या नोकऱ्यांसाठी घेण्यात आली. एवढंच नव्हे तर या नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं.
बनावट शाखेचा कसा झाला पर्दाफाश
अजय कुमार अग्रवाल या स्थानिक गावकऱ्याने छपोरा येथील एसबीआय किऑस्कसाठी अर्ज केला होता. गावात एका रात्रीत एका मोठ्या बँकेची शाखा उभी राहते, यावरून त्याला सुरुवातीला संशय आला होता. कारण, त्यांच्या गावाची अधिकृत बँक डाबरा येथे होती. कोणत्याही जाहिरात किंवा नोटीशीशिवाय अशी बँक उभी राहू शकते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे त्याने या शाखेची चौकशी केली. परंतु, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. तसंच, शाखेच्या साईनबोर्डवर शाखा क्रमांकही देण्यात आला नव्हता. अजयचा संशय आणि त्यानंतर डबरा शाखेच्या व्यवस्थापकाला दिलेल्या अहवालामुळे या गुंतागुंतीच्या घोटाळ्याचा उलगडा झाला. या बनावट शाखेचे व्यवस्थापक रेखा साहू, मंदिर दास आणि पंकज यांच्यासह चार लोकांची ओळख पटली आहे.
बँकेसाठी सात हजारांचं भाडं
गावातील रहिवासी तोषचंद्र यांच्या भाड्याने घेतलेल्या कॉम्प्लेक्समध्ये एसबीआयची बनावट शाखा सुरू करण्यात आली होती. जागेचे भाडे प्रति महिना सात हजार रुपये होते. फसवणूक करणाऱ्याने बँक कायदेशीर दिसण्यासाठी योग्य फर्निचर आणि चिन्हांची व्यवस्था केली होती.
कोरबा, बालोद, कबीरधाम आणि शक्तीसह विविध जिल्ह्यांतील बेरोजगार व्यक्तींना लक्ष्य करण्यात आलं होतं. ज्योती यादव यांनी दावा केला की, मी कर्मचारी म्हणून काम करते. मी माझी कागदपत्रे सादर केली, बायोमेट्रिक्स पूर्ण केले आणि त्यांनी मला सांगितले की माझे सामील होण्याचे निश्चित झाले आहे. मला तीस हजार पगार देण्याचे वचन दिले होते.”
दुसरी पीडित संगीता कंवर म्हणाली, “माझ्याकडे ५ लाख रुपये मागितले गेले होते, पण मी त्यांना सांगितले की मी इतके पैसे देऊ शकत नाही. आम्ही शेवटी २.५ लाख रुपयांवर सेटलमेंट केले. मला ३० ते ३५ हजार रुपये पगार देण्याचे वचन देण्यात आले होते.”
“अनेक गावकरी नवीन शाखेबद्दल उत्साहित होते आणि बँक पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर त्यांनी कर्ज घेण्याचा विचारही केला होता”, असं योगेश साहू म्हणाले. “खोटी बँक चालू राहिली असती तर अनेकांनी पैसे जमा केले असते आणि करोडोंची फसवणूक झाली असती”, असे गावकरी राम कुमार चंद्रा म्हणाले. बेरोजगार पीडितांना आता केवळ आर्थिक नुकसानच नाही तर कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागत आहे.