चाहत्याच्या श्रीमुखात भडकावल्याप्रकरणी माफी मागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाला दिले आहेत. गोविंदाने २००८ साली आपल्या एका चाहत्याच्या कानशीलात लगावली होती. याप्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने गोविंदाच्या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत एखाद्या फिल्मस्टारने सार्वजनिक ठिकाणी मारामारीसारखी कृत्य करू नये, असे निरीक्षण नोंदवले आहे.
न्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने गोविंदाने चाहत्याच्या कानशीलात लगावल्याचा व्हिडिओ न्यायालयात पाहिला आणि गोविंदाच्या कृत्यावर खेद व्यक्त केला. एखादा अभिनेता चित्रपटात जसं वागतो, तसं त्याने आपल्या खऱया आयुष्यात वागण्याची गरज नसते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
गोविंदाने २००८ साली एका चित्रपटाच्या सेटवर संतोष रॉय या चाहत्याच्या कानशीलात लगावली होती. अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या संतोष यांनी त्या घटनेनंतर आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कायदेशीर लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता.