वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कोलकाता येथील एएमआरआय रुग्णालयाने आणि तीन डॉक्टरांनी अमेरिकास्थित भारतीय डॉक्टरला ५.९६ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आह़े  या डॉक्टरच्या पत्नीचा १९९८ साली वैद्यकीय हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता़  न्या़  एस़ ज़े  मुखोपाध्याय आणि न्या़ व्ही़  गोपाला गोवडा यांच्या खंडपीठाने ही भरपाई आठ आठवडय़ांमध्ये देण्याचेही आदेश या वेळी दिले आहेत़
कुणाल साहा असे या डॉक्टरचे नाव असून ते ओहायो येथे एड्स संशोधक आहेत़  त्यांची पत्नी अनुराधा हिचा सदोष उपचारांमुळे मृत्यू झाला होता़  भारतीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने २०११ साली त्यांना १.७३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देऊ केली होती़  भरपाईची रक्कम वाढवीत, त्या रकमेवर सहा टक्के दराने व्याजही देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़  या एकूण रकमेपैकी डॉ़  बलराम प्रसाद आणि डॉ़  सुकुमार मुखर्जी यांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि डॉ़  बैद्यनाथ हलदेर यांनी पाच लाख रुपये येत्या आठ आठवडय़ांत डॉ़  साहा यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत़  उर्वरित रक्कम व्याजासह रुग्णालयाने देण्याचे आदेश आहेत़  विशेष म्हणजे नुकसानभरपाई देण्यात आल्याचा अहवालही न्यायालयापुढे सादर करावा, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आह़े  साहा यांनी भारतीय ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे ७७ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती़
अनुराधा या स्वत: बालमानसशास्त्र तज्ज्ञ होत्या़  १९९८ साली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्या कोलकात्यातील त्यांच्या गावी आल्या होत्या़  अंगावर पुरळ उठल्यामुळे त्या डॉ़  मुखर्जी यांच्याकडे उपचारासाठी  गेल्या होत्या़  मुखर्जी यांनी दिलेल्या लसीमुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना एएमआरआय रुग्णालयात दाखल करावे लागल़े  पुढे त्यातच त्याचा मृत्यू झाला होता़
मानवी आयुष्याचे मूल्य वाढविणारा निकाल -डॉ. साहा
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल ऐतिहासिक आह़े  भारतीय वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी या निकालाचे दूरगामी परिणाम होतील, असे मत या डॉ़  साहा यांनी व्यक्त केले आह़े  हलगर्जीपणा करून देशभरातील निष्पाप रुग्णाच्या जिवाशी दररोज खेळणाऱ्या रुग्णालय आणि डॉक्टरांना या निकालामुळे चांगलाच चाप बसेल़  या निकालामुळे भारतातील मानवी आयुष्याचे मूल्य वाढेल,
असेही ते म्हणाल़े    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc asks kolkatas amri hospital to pay rs 5 96 cr for medical negligence
Show comments